मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीतून राज्याच्या सामाजिक राजकीय आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
पवार पुन्हा कामांमध्ये सक्रिय
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आणि महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात होणार आहे. शरद पवार यांच्यावर पित्ताशयाच्या त्रासामुळे झालेल्या शस्त्रक्रियेनंतर शरद पवार पुन्हा एकदा आपल्या कामांमध्ये सक्रिय झाले आहेत. त्यानंतर लगेचच शरद पवार यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
कोरोना परिस्थितीचा आढावा
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच मंत्री आणि महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. सध्या राज्यामध्ये असलेली राजकीय परिस्थिती, सामाजिक प्रश्न आणि कोरोनाची जिल्ह्या जिल्ह्यात असलेली परिस्थिती याबाबत पवार आज आपल्या मंत्री आणि नेत्यांकडून आढावा घेणार आहेत. शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक मंत्री आणि नेत्यांकडे दिलेल्या जबाबदारी बाबत लेखाजोखाही घेतला जातो. शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून आढावा बैठक घेण्यात आली नव्हती. मात्र, शरद पवार हे आता पुन्हा एकदा सक्रिय झाल्यानंतर त्यांनी तातडीने ही महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे.