सोलापूर - राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती राज्य आणि केंद्र सरकारच्या समोर मांडणार आहे. जर त्यांनी योग्य ती दखल घेऊन उपाय योजना केल्या नाहीत तर सरकारला शेतकऱ्याच्या बांधावर यावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
शरद पवार यांनी राज्यातील मतदान संपल्यानंतर मंगळवारी सांगोला आणि मंगळवेढा या तालुक्यातील दुष्काळी पाहणी दौरा काढला होता. यावेळी पवारांनी सांगोला तालुक्यातील मंगेवाडी येथील चारा छावणीला भेट दिली. तसेच अजनाळे गावातील जळालेल्या डाळिंबाच्या बागांना देखील भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. सांगोला तालुक्यात तर पाण्याअभावी पिके जळत आहेत. जनावरांना चारा नाही तर, लोकांच्या हाताला काम नाही, अशा परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील दुष्काळाची परिस्थिती राज्य आणि केंद्र सरकारला सांगणार आहे. यावर राज्य आणि केंद्र सरकारने तत्काळ उपाययोजना कराव्यात. सरकारने दुष्काळी उपाययोजना केल्या नाही तर सरकारला शेतकऱ्यांच्या बांधावर यावे लागेल, असा इशारा शरद पवार यांनी सांगोल्यात दिला आहे.
शरद पवार यांनी सांगोला तालुक्यातील मंगेवाडी अजनाळे गावातील चारा छावण्या, कोरडी पडलेली शेततळ्यासह जळालेल्या डाळिंबाच्या बागांची पाहणी केली. त्यानंतर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी पवारांच्या समोर अनेक अडचणी मांडल्या. शरद पवार यांच्या या दुष्काळी दौऱ्यामध्ये सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, पंढरपूरचे आमदार भारत भालके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस यांच्या निधनामुळे दौरा अर्धवट सोडला -
शरद पवार हे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आले होते. मात्र, पवार सांगोल्यातील अजनाळे गावात असतानाच माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हनुमंत डोळस यांच्या निधनाची घोषणा डॉक्टरांकडून करण्यात आली. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांचा दुष्काळी दौरा अर्धवट सोडला. सांगोल्यातूनच दौरा अर्धवट सोडून ते बारामतीला गेले. हनुमंत डोळस यांच्या निधनामुळे पवारांनी डोळस यांना अजनाळे गावात श्रद्धांजली वाहिली.