सोलापूर - लोकसभा निवडणुकीत भाजपचे तिकीट मिळविण्यात अपयशी ठरलेले विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनी राजकारण हे सरळ माणसाचे काम नाही असे म्हटले आहे. देशाच्या गृहमंत्र्यांचा १ लाख ४६ हजार मतांनी पराभव केल्यानंतरही स्थानिक भाजपचे नेते आणि अन्य मंत्र्यांनी केलेल्या विरोधामुळे खासदार बनसोडे यांना तिकीट मिळाले नाही. त्याची सल शरद बनसोडेंच्या मनात राहिली आहे. ती व्यक्त करताना ते 'मी घर जाळून राजकारण केले' असे सांगतात.
सोलापुरात भाजपांतर्गत पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे परस्परविरोधी २ कट्टर राजकीय गट आहेत. या २ गटात नेहमी कुरघोड्यांचे राजकारण झालेले सोलापूरकरांनी अनेकदा पाहिले. पण खासदार बनसोडे यांनी नेहमी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. नेमकी हीच गोष्ट बनसोडेंच्या अंगांशी आली. त्यांच्या खासगी जीवनातल्या अनेक गोष्टी सार्वजनिक झाल्या. पुढे त्याच गोष्टींचे राजकारण करण्यात आले. दोन्ही देशमुखांच्या गटांनी खासदार बनसोडे यांचे तिकीट कापण्यात आपली ताकद लावली.
सुरुवातीला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यसभा खासदार अमर साबळे यांचे तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी लिंगायत धर्मगुरु डॉ. जयसिद्धयेश्वर स्वामी यांचे नाव पुढे आणले. मग विधानसभा निवडणुकीत लिंगायत मतांच्या भीतीपोटी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पालकमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळला. त्यामुळे विद्यमान खासदार बनसोडे यांचा पत्ता कट झाला आणि सोलापूरची उमेदवारी डॉ. स्वामी यांना देण्यात आली.
भाजपने तिकीट नाकारल्यानंतर प्रथमच बनसोडे आज माध्यमांसमोर आले. त्यांनी सुरुवातीला पत्रकारसंघात मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांनी सर्व पत्रकारांना चहासाठी नेले. चहा पित चर्चा करत असताना त्यांनी राजकारणातील माहिती पत्रकारांसमोर मांडली. बनसोडेंचा हा वावर अनेकांना धक्का देऊन गेला. पण पत्रकारांशी मारलेल्या गप्पात त्यांनी राजकारणाचे जळजळीत वास्तव उघड केले आहे.