सोलापूर - शिवसेनेचे अॅड. शहाजी बापू पाटील हे आमदार व्हावेत, म्हणून केलेला नवस पूर्ण करण्यासाठी सांगोला शहरातील आयुब मुलाणी हे सांगोला ते विशाळगड प्रवासाठी चालत निघाले आहेत. ते 230 किलोमीटरचा प्रवास पायी चालत करणार आहेत. त्यामुळे या अनोख्या नवसाची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे.
2014 मध्ये सांगोला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला होता. त्यामुळे 2019 विधानसभा निवडनुकीमध्ये पाटील हे शिवसेनेमधून निवडून यावेत, यासाठी आयुब हसन मुलानी (वय 48) या कार्यकर्त्याने आपला नेता विजयी झाल्यास सांगोला ते विशाळगड असा 230 किलोमीटरचा प्रवास पायी करणार, असा नवस केला होता.
हेही वाचा - औषधाने मुले होतात अस सांगून दाम्पत्याला गंडवले; 3 बोगस डॉक्टर गजाआड
त्यानंतर निवडणुकीमध्ये पाटील यांचा विजय झाल्यानंतर 30 ऑक्टोंबरला नवस फेडण्यासाठी आयुब मुलाणी यांनी सांगोला येथून पायी चालत जाण्यासाठी सुरुवात केली आहे. आयुब मुलाणी हे पायी चालत जात असताना सांगोला शहरातील नागरिक व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अतुल पवार, प्राध्यापक संजय देशमुख, निसार तांबोळी, ज्ञानेश्वर तेलीसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा - माढ्यात एमआयडीसी सुरू करण्यासाठी आंदोलन; संघर्ष समिती स्थापन करून लोकचळवळ