सोलापूर- एकीकडे महाराष्ट्रातल्या नद्या हाहाकार माजवत असताना, जिल्ह्यातील सीना नदी मात्र पाण्याला आसुसलेली आहे. यंदाच्या जनजीवन विस्कळीत करणाऱ्या पावसाळ्यात ही नदी साधी खळखळली सुद्धा नाही. त्यामुळे या नदीचे कोरडे पात्र अहमदनगर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता स्पष्ट करत आहे.
सीना नदीचा उगम अहमदनगरच्या उत्तरेस झाला आहे. कमी पावसामुळे या नदीचे पात्र कोरडे ठाक पडले आहे. विशेष म्हणजे, या नदीपासून अवघ्या चाळीस कि.मी अंतरावर वाहणारी भीमा (चंद्रभागा) नदी ओसांडून वाहत आहे. अडीच लाख क्युसेक क्षमतेने भीमा नदीतील पाणी कर्नाटकात वाहून जात आहे. सोडण्यात आलेल्या पाण्याची क्षमता आता सव्वा लाखावर पोहोचली आहे. मात्र याच भीमेला हत्तरसंग कुडल येथे मिळणारी सीना नदी पावसाअभावी कोरडी पडली आहे.
सध्या भीमेला आलेल्या पुरानंतर दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेची चर्चा सुरु झाली आहे. म्हणून पूरग्रस्त भीमाकाठ वगळता उर्वरित जिल्ह्यातील शेतकरी व जनता आठ दिवसांपासून पाणी सोडण्याची मागणी करत आहे. त्याला जलसंपदा विभागाकडून प्रतिसादही मिळाला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भीमा-सीना योजनेतून पूर्ण क्षमतेने पाणी सुद्धा सोडण्यात आले. पण ते पाणी अद्याप तीव्र दुष्काळी पट्ट्यात पोहचले नाही. त्यामुळे आजही सीना नदी पाण्याला आसुसली आहे आणि सीनाकाठ तहानलेला आहे.