सोलापूर - कोरोनामुळे संपूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली होती. जवळपास तीन महिने देशातील उद्योग धंदे संपूर्णपणे बंद होते. टाळेबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योजकांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने तीन लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून ज्या उद्योजकांनी सरकारी बँकेकडून कर्ज घेतले आहे. त्यांना वाढीव कर्ज देण्यात येणार आहे. मात्र, केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना सोलापुरातील गारमेंट उत्पादकांच्या काहीही फायद्याची नाही. शासनाने लघु उद्योजकांना 4 लाख रुपयांचे नवीन कर्ज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे सचिव राजेंद्र कोचर यांनी 'ईटीव्ही' भारत'शी बोलताना सांगितले.
सोलापुरातील गारमेंट उद्योगांमध्ये सूक्ष्म व लघुउद्योजक म्हणून काम करणाऱ्या उद्योजकांकडे कर्जाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे सरकारने जो 20 टक्के कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचा प्रत्यक्षात कोणताही फायदा सोलापुरातील गारमेंट उत्पादनातील सूक्ष्म व लघु उद्योजकांना होणार नाही. याचा फायदा केवळ मोठ्या उद्योजकांनाच होणार आहे.
सोलापूर शहरात नव्याने होत असलेल्या गारमेंट हबमधील सूक्ष्म व लघु उद्योजकांना केंद्र सरकारकडून मदत होणे गरजेचे आहे. मागील तीन महिन्यांपासून हा उद्योग पूर्णपणे बंद असल्यामुळे आता सुरू होत असलेल्या गारमेंट उद्योगाला केंद्र सरकारकडून चार ते पाच लाख रुपये पाच वर्षाच्या मुदतीसाठी मिळणे गरजेचे आहे. जर केंद्र सरकारकडून सूक्ष्म व लघु उद्योजकांना पाच लाखापर्यंतची कर्ज स्वरूपात रक्कम मिळाली आणि त्यांची परतफेड ही पाच वर्षांची देण्यात आली तर अशा प्रकारे लघु उद्योजकांना मोठी मदत होणार आहे. मात्र, सरकारकडून अशा प्रकारची मदत न होता अगोदरच कर्ज घेतलेल्या मोठ्या कर्जदारांना केंद्र सरकारचे हे पॅकेज फायदेशीर ठरणार असल्याचेही कोचर यांनी सांगितले आहे.
सोलापुरात गणवेश तयार करणारे सुमारे बाराशे सूक्ष्म व लघु उद्योजक आहेत. यातील सुमारे अकराशेहून अधिक उद्योजक हे कमी भांडवलात काम करणारे आहेत. सोलापुरातील फक्त 15 ते 20 जण असे आहेत, ज्यांचा व्यवसाय हा 25 कोटींहून अधिक आहे. उर्वरीत उद्योजक हे कमी भांडवलात उद्योग करत आहेत. या लघु उद्योजकांना केंद्र सरकारच्या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही. तसेच कर्ज ज्यांनी कधीच कर्ज घेतले नाही, पण सध्या कोरोनामुळे अडचणीत आहेत, अशा उद्योजकांनाही याचा काहीच फायदा होणार नाही, असे कोचर यांनी सांगितले.
हेही वाचा - सोयाबीन पेरल्यावर ते उगवलेच नाही; विकलेले बियाणे कंपनीने बोलावले परत