सोलापूर - मोहोळ तालुक्यातील विज्ञानग्राम अंकोली येथे भुकंप, चक्रीवादळ, टोळधाड, उष्णतालाट, गारपीट, अवकाळी पाऊस आणि भटकी व जंगली जनावरे यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी नैसर्गिक वातानुकुलीत शिवारघर व समृद्ध जिविधापूर्ण कौटुंबिक बाग उभारली आहे. अशा प्रकारचे यशस्वी संशोधन करून आपत्तीपासून बचाव होण्यासाठी ठोस उत्तर शोधण्यात संशोधक अरुण देशपांडे यांना यश आले आहे.
गेली २ वर्षे ही बाग आणि शिवारघर सर्व नैसर्गिक संकटांना तोंड देत उभी आहे. कारण ती एका ५ हजार ५०० चौफूट जिओडेसिक डोमच्या शेडनेट/स्कर्ट पाॅलीहाऊसच्या आत अत्यंत सुरक्षित आहेत. नैसर्गिक संकट या शिवारघराचे काहीही नुकसान करू शकत नाही. सध्या उभा असलेला डोम ५५०० चौ फूट आहे. उंची ३५ फूट मध्यभागी तीन माळ्यांचे १ हजार १०० चौफूट घर, गोठा आणि गच्ची असे नवीन डिझाईन ८ हजार चौफूट २.३० लाख घनफूट आहे. डोमची मध्यभागी उंची ५० फूट आहे. तर सभोवताली अकीरा मियावाकी टाईप घनदाट देवराई आहे. यापुढे शिवारघरे परसबागा वाड्या सुरक्षित करताना आमुलाग्र नवीन वैज्ञानिक विचार करावाच लागेल, असे संशोधक अरुण देशपांडे यांना वाटते.
सरकारने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना, त्यांना अनुदान देताना आणि बॅंकांनी कर्ज देताना या डिझाईन्सचा विचार करावा करावा, असे आवाहनही संशोधक अरुण देशपांडे यांनी केले आहे.