सोलापूर - येथील माढा तालूक्यातील श्रीक्षेत्र अरण येथे हजारो भक्तांच्या साक्षीने पारंपारिक श्रीफळ हंडीचा सोहळा पार पडला. श्रीफळ हंडी फिरती ठेऊन ही हंडी फोडण्यात आली. अर्धा तास हा नयनरम्य सोहळा सुरू होता. राज्यात इतरत्र दहीहंडी हा कार्यक्रम घेतात. मात्र, श्रीक्षेत्र अरण या ठिकाणीच शेकडो नारळ बांधून श्रीफळ हंडी हा उत्सव साजरा केला जातो.
कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी असे म्हणत आपल्या कामातच देव पाहणाऱ्या संत सावता माळी महाराजांच्या पूण्यतिथी निमित्त अनोखा असा श्रीफळहंडीचा सोहळा पार पडला. राज्यात सगळीकडे दहीहंडी साजरी केली जाते. मात्र संत सावता माळी महाराज यांच्या अरण गावात श्रीफळ हंडी साजरी केली जाते. भक्तानी आणि वारकऱ्यांनी वाहिलेले नारळ बांधून ही श्रीफळ हंडी तयार करण्यात येते. हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा नयनरम्य सोहळा पार पडला.
राज्यातील आणि देशातील अनेक संताच्या पालख्या या पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. मात्र, महाराष्ट्रातील एकमेव संत असे आहेत की, जे कधीही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीला गेले नाहीत. ते संत म्हणजे संत सावता माळी. आपल्या कामातच देव पाहणाऱ्या संत सावता माळी यांच्या भेटीलाच स्वत: विठ्ठल अरण या क्षेत्री आले होते. विठ्ठलाची पालखी ही अरण येथे आली असता, सावता महाराज यांच्या पूण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रीफळ हंडीचा सोहळा वर्षानूवर्षे परंपरेने चाललेला आहे. हा नयनरम्य सोहळा अर्धातास चालला.
श्रीक्षेत्र अरण येथील संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या 724 व्या पुण्यतिथी सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असलेला श्रीफळ हंडी फोडण्याचा कार्यक्रम अपार उत्साहात पार पडला. संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर कुंटूंबातील बापूसाहेब देहूकर, बाळासाहेब देहूकर, कान्होबा देहूकर यांनी श्रीफळ हंडी फोडली.
'ज्ञानोबा तुकारामच्या' जयघोषात, टाळ, मृदंगाच्या नादात मोठ्या भक्तिमय वातावरणात संत शिरोमणी सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असलेला श्रीफळहंडी फोडण्याचा कार्यक्रम अपार उत्साहात पार पडला. सायंकाळी सहा ते साडे सहा पर्यंत हा सोहळा पार पडला. यावेळी संत सावता माळी महाराज पालखीसमोर देहूकर मंडळींचे किर्तन झाले. तर विठ्ठलाच्या पालखीसमोर अरण व परिसरातील भजनी मंडळाने भजन गायले. सुमारे अर्धा तास सुरू असलेला हा नयनरम्य सोहळा मंदीरा समोरील प्रांगणात पार पडला. यावेळी श्रीफळहंडीचे नारळ प्रसाद म्हणून मिळविण्यासाठी तरूणांची धडपड पाहावयाला मिळाली. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी संत सावता माळी मंदिर, शिवाजी कांबळे यांचे निवासस्थान, ग्रामपंचायत कार्यालय, सभामंडप, यात्री निवास या इमारतींवर गर्दी केली होती.