सोलापूर - महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार नाही.पूर्ण पाच वर्षापर्यंत टिकेल असे माजी वनमंत्री संजय राठोड यांनी सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले. विरोधी पक्षातील अनेक नेते हे यापूर्वी महाविकास आघाडी सरकारबाबत अनेक भविष्यवाणी करत होते. हे सरकार दोन महिन्यांत पडणार, चार महिन्यांत पडणार. पण आता हे सर्व बंद झाले आहे. म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडून अशी विधाने केली जात आहेत.
सोलापुरातील मुळेगाव तांडा येथे बंजारा समाजाची सहविचार सभा आयोजित केली होती. या सभेला माजी कॅबिनेट मंत्री संजय राठोड उपस्थित होते. यानंतर त्यांनी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
राजकारणाची पातळी कुठंपर्यंत जात आहे, हे बघितलं पाहिजे - संजय राठोड
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हणाले होते की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्यांच्या कानाखाली लगावली तरी देखील कोणीही सरकारमधून बाहेर पडणार नाही. यावर माजी वनमंत्री संजय राठोड म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत, राजकारणाची पातळी कुठपर्यंत जाऊ द्यायची, भाषा कशी वापरायची हे बघितले पाहिजे.
हे ही वाचा -खळबळजनक.. एसीपी असल्याचे सांगून पुण्यात शिक्षिकेवर बलात्कार, पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न
मी स्वतःहून राजीनामा दिला आहे - संजय राठोड
माजी कॅबिनेट मंत्री संजय राठोड म्हणाले की, मी स्वतः हुन राजीनामा दिला आहे. माझ्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती सांगितली. माझा राजीनामा वाचून दाखविला होता. मी चार वेळा शिवसेना पक्षातून निवडून आलो आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात कोणाला घ्यावयाचे आहे. कोणाचा समावेश करावयाचा की नाही, याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे.
हे ही वाचा - अशोक चव्हाण मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राहतील, तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणे अशक्य - प्रताप पाटील-चिखलीकर
बंजारा समाजाच्या 25 मागण्या -
मागील युतीच्या सरकारमध्ये मी महसूल राज्यमंत्री होतो. त्यावेळी आम्ही बंजारा समाजाच्या 25 मागण्या केल्या होत्या. त्या 25 मागण्यांची दखल राज्य सरकारने घ्यावी, अशी आमची विनंती असल्याची माहिती संजय राठोड यांनी दिली.