पंढरपूर - श्री विठ्ठल मंदिर परिसरातील प्रदक्षिणा मार्गाचे काँकिटीकरण करण्यासाठी ३ कोटी 89 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी यात्रा अनुदानापोटी पाच कोटी रुपयांच्या निधी दिला होता. त्यातील तीन कोटी 89 लाख रुपयांचा विकासकामांना मंजुरी दिल्याची माहिती पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष साधना भोसले यांनी दिली.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते नगराध्यक्षांना पाच कोटी रुपयांचा धनादेश
आषाढी यात्रा वेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आषाढी अनुदानापोटी पाच कोटी रुपयांचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे दिला होता. त्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी एक समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये जिल्हा प्रशासन अधिकारी, नगराध्यक्ष साधना भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची समिती गठित केली होती. या समितीची सभा जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली.
आषाढी अनुदान खर्चातून विकासकामांना मंजुरी
पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात येणारा प्रत्येक भाविक हा प्रदक्षिणा मार्गावरून जात असतो. याचा विचार करून प्रदिक्षणा मार्गावरील कालिका देवी चौक ते चौफाळा ते नाथ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामी ३ कोटी ७९ लाख मंजुरी दिली तर तालुका पोलीस स्टेशन ते तहसील कार्यालय ते ठाकरे चौक ते राम मंदिर ते दत्त नगर या ठिकाणी झालेल्या काँक्रिट रोडवर पथदिवे बसविण्याच्या कामासाठी ७० लाखांची मंजुरी दिली आहे. कोरोनाविषाणूमुळे प्रतिकात्मक पद्धतीने भरविण्यात आलेल्या पंढरपूर येथील आषाढी, कार्तिकी, माघी यात्रा कालावधीमध्ये साफसफाई करणे, जंतुनाशक फवारणी, वाखरी पालखी तळावर ईओसी सेंटर उभे करणे व इतर कामासाठी ५२ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती साधना भोसले यांनी दिली.