सोलापूर - माजी मंत्री अण्णा डांगे आणि काँग्रेसचे आमदार रामहरी रुपनवर तसेच राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी एकत्रितपणे पुढाकार घेत धनगर समाजाचा मेळावा पंढरपुरात आयोजीत केला आहे. 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या मेळाव्याला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती दोन दिवसांपूर्वीच अण्णा डांगे आणि रामहरी रूपनर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. मात्र हा मेळावा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
शरद पवार आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीच्या मुद्यावरुन धनगर समाजात उभी फूट पडली असल्याचे दिसून येत आहे. पवारांच्या आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीला सकल धनगर समाजाचे समन्वयक सुभाष मस्के यांनी विरोध केला आहे. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून पवार व गांधी यांना बोलावण्यास आमचा तीव्र विरोध आहे, असे सुभाष मस्के यांनी पंढरपुरातील पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.
गेल्या आठ वर्षापासून धनगर समाज आपल्या हक्काचे आरक्षण लढा लढत आहे. केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या यादीत महाराष्ट्रातील धनगड या समाजाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, धनगड ही जमातच राज्यात अस्तित्वात नाही. असे असताना देखील महाराष्ट्रातील धनगर समाजास आरक्षणापासून वंचित ठेवले गेले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीमधील नेत्यांनी सदैव धनगर समाजावर अन्याय केला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते, तरीही त्यांनी धनगर समाजास न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही, असा आरोपही सुभाष मस्के यांनी यावेळी केला.
सकल धनगर समाजाचा या मेळाव्यास शरद पवार व प्रियंका गांधी यांना बोलावण्यास विरोध आहे. जर या मेळाव्याला हे आले, आणि त्यामुळे धनगर समाजातील संतप्त युवकांकडून काही अनुचित प्रकार घडल्यास त्या मेळाव्याचे आयोजक जबाबदार राहतील. असा इशारा यावेळी सकल धनगर समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला.