सोलापूर - आषाढी वारीसाठी राज्यभरातून संताच्या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. त्याचप्रमाणे बुलडाणा जिल्ह्यातील शेगावचे संत गजानन महाराज यांच्या पालखीचे रविवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथे मोठ्या भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी सिद्धीविनायक प्रतिष्ठान आणि जयहिंद शुगर यांच्या वतीने वारकऱ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
गजानन महाराजांची पालखी प्रतिवर्षी तिऱ्हे गावी मुक्कामी असते. पालखीसोबत सुमारे सातशे वारकरी आणि हत्ती घोड्यांचा लवाजमाही आहे. सोलापूर शहरातील २ दिवसांच्या मुक्कामानंतर महाराजांची पालखी रविवारी सांयकाळी तिऱ्हे गावात दाखल झाली. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या भक्तीमय वातावरणात पालखी व दिंडीचे स्वागत केले. गावातील संत आप्पाजी महाराज मंदिरात पालखी तळाची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिराचे प्रमुख विठ्ठल पाटील आणि ग्रामस्थांनी यावेळी आलेल्या वारकऱ्यांची सर्व व्यवस्था केली.
तर सिद्धीविनाक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगिराज पाटील यांनी वारकऱ्यांना प्रसादाचे वाटप केले. यावेळी जय हिंद साखर कारखान्याचे अधिकारी गणेश शिंदे, गोवर्धन जगताप, गोविंद सुरवसे, अनिल शिंदे, तात्यासाहेब पाटील, गोपाळ सुरवसे, आप्पासाहेब कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, पालखी आणि दिंडी गावात पोहोचताच यावेळी तिऱ्हे पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थिती लावून गजानन महाराजांचे दर्शन घेतले. याच बरोबर ग्रामस्थांनी सायंकाळी वारकऱ्यांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांसाठी जेवणाची सोय केली होती. मंदिर प्रांगणात सायंकाळी विठ्ठलाच्या जयघोषात कीर्तन सोहळा पार पडला.
रविवारी पालखीने मुक्काम केल्यानंतर आज पहाटे पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालात आणि गण गणात बोते च्या गजरात पालखी गावातून मार्गस्थ केली. त्यावेळी संपूर्ण तिऱ्हे गाव भक्तीरसात चिंब होऊन गेले होते. दरम्यान, यावेळी दिंडीतील वारकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी संत गजानन महारांजाकडे तिऱ्हे पंचक्रोशीसह जिल्ह्यात दमदार पाऊस पडावा, असे साकडे घातले.