सोलापूर- राज्य सरकारने 7 मे 2019 रोजी जीआर काढून मागासवर्गीयांना पदोन्नतीच्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. हा शासन निर्णय म्हणजे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे हा जीआर रद्द करून पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण द्या, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सरचिटणीस राजा सरवदे यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी आंदोलन करण्यात आले.
अनुसूचित जाती व जमाती यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे. शासनाचा जीआर रद्द करण्यात यावा अशा विविध घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला होता. जीआर रद्द करून पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय त्वरित घ्यावा, अशा मागणीचे निवेदनही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आले. यावेळी कार्यकत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सदर बझार पोलिसांचा मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.