सोलापूर - तामिळनाडुतील सेलम येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेली सोलापूरची लेक रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांनी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारताची निवडणूक प्रकिया जगाला सांगण्यासाठी भारतातून २ जिल्हाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये रोहिणी भाजीभाकरेंचा समावेश आहे. त्यांचा हा सन्मान म्हणजे सोलापूर जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.
१५ ऑगस्ट २०१९ ला दुपारी १ वाजता नॅशनल जिओग्राफी या आंतराष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या माध्यमातून 'द ग्रेट इंडियन इलेक्शन' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये रोहीणी भाजीभाकरे या संपूर्ण जगाला भारतात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया कशी पार पडते याची माहिती देणार आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते, याची जगाला माहिती व्हावी हाच यामागे उद्देश आहे. रोहीणी भाजीभाकरे यांच्याबरोबर वाराणसीच्या जिल्हाधिकारी यांचीही निवड झाली आहे.
रोहिणी भाजीभाकरे या मूळ सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथील रहिवासी आहेत. त्या सध्या तामिळनाडूतील सेलम येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीने माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात आनंद व्यक्त होत आहे.
नेमक्या काय म्हणाल्या रोहिणी भाजीभाकरे
भारताची लोकशाही जगाला समजून सांगण्यासाठी भारतातून फक्त दोनच जिल्हाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये आपला समावेश आहे, याबद्दल काय सांगाल?
भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. ही माझ्यासाठी खूप सन्मानाची आणि भाग्याची गोष्ट असल्याची माहीती रोहिणी भाजीभाकरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
निवडूक प्रक्रियेबद्दलची नेमकी काय माहिती सांगणार आहात?
लोकशाही देशामध्ये निवडणूक प्रक्रिया कशी होते. त्यामध्ये लाखो अधिकाऱ्यांचा कसा सहभाग असतो. त्यासंबधी माहिती आम्ही देणार आहोत. या माहितीमुळे जगातल्या इतर देशांना प्रेरणा मिळेल.
आपली निवड कशाच्या आधारावर करण्यात आली आहे?
मला वाटते की, कामाच्या आधारावर आमची निवड करण्यात आली आहे. सेलम जिल्ह्याची पहिली महिला जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली आहे.
निवडणुकीच्या काळात अधिकाऱ्यांवर खूप मोठी जबाबदारी असते. मात्र, त्याची कुठे चर्चा होताना दिसत नाही?
अधिकाऱ्यांनी प्रकाशझोतात येण्याची गरज नाही. कायद्याने आम्हाला जे अधिकार दिले आहेत, त्याप्रमाणेच आम्ही काम करतो. त्यामुळे चर्चा नाही झाली तरी चालेल. कारण आम्ही प्रथम लोकसेवक असतो आणि त्यानंतर अधिकारी असतो. त्यामुळे सर्वांनी सेवाभावी वृत्तीने काम करावे असेही भाजीभाकरे म्हणाल्या.