पंढरपूर (सोलापूर) - सांगोला तालुक्यात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिवणे शाखेत दरोडा पडला आहे. चोरट्यांनी गॅस कटरने खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून बँकेची तिजोरी फोडून सुमारे सात लाख आठ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे दरोडा पडल्यामुळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सांगोला तालुक्यातील शिवणे येथे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. या शाखेत गुरुवारी बँक मॅनेजर राजेंद्र तुकाराम गुळमिरे हे कार्यालयीन कामकाज संपवून रोख रक्कम सात लाख आठ हजार 498 रुपये बँकेच्या तिजोरीत ठेवून गेले होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कटरच्या साह्याने बँकेच्या मागील बाजूच्या खिडकीची ग्रील तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यानंतर बँकेतील कर्जदारांचे दस्तावेज जाळून टाकले.
सकाळच्या सुमारास सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून धूर येत होता. दरोड्याची माहिती बँक मॅनेजर गुळ यांना देण्यात आली. सांगोला पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. बँकेतील चोरीच्या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.