सोलापूर - प्रकाश आंबेडकरांच्या अनुपस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूरमधील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. वंचितच्या वतीने सत्तासंपादन महारॅली काढून सभेचे आयोजन करण्यात आले होते. वंचितचे संसदीय मंडळाचे अध्यक्ष अण्णाराव पाटील, प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा घेण्यात आली. ही रॅली सोलापूर शहरातील तुळजापूर नाका येथून रुपा भवानी मंदिरापर्यंत काढण्यात आली.
जुना तुळजापूर नाका येथे सोलापूर शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्याचे प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सत्तासंपादन महारॅली चे जंगी स्वागत केले. ही रॅली शहरातील तुळजापूर नाका येथून रूपा भवानी मंदीर पर्यंत काढण्यात आली. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. सभेपूर्वी शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांच्या नवयान महाजलसा टीमने चळवळीच्या गाण्यांचा कार्यक्रम सादर केला.
हे ही वाचा - अखेर आघाडीचे गणित ठरले! जागावाटपात राष्ट्रवादीची सरशी ?
राज्यातील जनताही सेना-भाजप सरकारला कंटाळलेली आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष राज्यातून हद्दपार झालेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही सत्तास्थापनेची प्रमुख दावेदार आहे. संपूर्ण राज्यात वंचित बहुजन आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. येणारा मुख्यमंत्री हा वंचितचा असेल, असे मत अण्णाराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
हे ही वाचा - कोल्हापुरात मुख्यमंत्री, महसुलमंत्र्यांच्या बॅनरवर फासले काळे
दरम्यान, या सभेसाठी अॅड. प्रकाश आंबेडकर हे उपस्थित राहणार होते. मात्र, काही कारणामुळे आंबेडकर हे या सभेसाठी अनुपस्थित राहू शकले नाही. तरीही सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर पूर्णपणे भरून सभागृहाच्या बाहेर देखील गर्दी झाल्याचे पहायला मिळाले.
हे ही वाचा - माणूस आरक्षणाने नाही, तर कर्तृत्वाने मोठा होतो - नितीन गडकरी