सोलापूर - पतीने दुसरे लग्न केले या कारणावरून कंबर तलाव (संभाजी तलाव) मध्ये उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या महिलेस दिनेश जाधव या जागरूक नागरिकाने वाचविले. ही घटना समजताच बघ्यांची मोठी गर्दी कंबर तलावजवळ झाली होती. शेवटी त्या महिलेस विजापूर नाका पोलीस ठाणे येथे आणून त्याची फिर्याद घेण्यात आली. रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
काय आहे प्रकरण -
पतीने दुसरे लग्न केले असल्याने पीडित महिला मागील अनेक दिवसांपासून मानसिक तणावात होती. दोन लहान मुले असताना देखील पतीने दुसरे लग्न केले. यामुळे शेवटी तिने रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास टोकाचा निर्णय घेत आत्महत्या करण्यासाठी रिक्षा मधून कंबर तलावाकडे आली. दोन्ही लहान मुलांना घेऊन ती पाण्यात उतरताना दिनेश जाधव यांनी पाहिले. प्रसंगावधान ओळखून जाधव यांनी ताबडतोब त्या ठिकाणी धाव घेत महिलेला पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण सुरुवातीला पीडितेने जाधव यांना विरोध केला. तरीदेखील जाधव यांनी तिचा विरोध मोडीत काढत तिच्यासह मुलांना पाण्याबाहेर आणले आणि त्यांची विचारपूस केली.
महिला पोलिसांनी काढली महिलेची समजूत -
पोलीस कंट्रोलला याची माहिती मिळाली. तेव्हा सदर बझार पोलीस ठाणे व विजापूर नाका पोलीस ठाण्याचे बिट मार्शल ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. महिला पोलीसांनी पीडितेची समजूत काढली आणि विजापूर नाका पोलीस ठाणे येथे तिला घेऊन गेले. पतीने दुसरे लग्न केले या मानसिक त्रासातून आत्महत्या करत असल्याची माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली. दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी महिलेचा प्राण वाचवणाऱ्या दिनेश जाधव यांचा सत्कार केला.