सोलापूर - आठ मे नंतरच्या लाॅकडाऊन काळात रमजान सणा निमित्त 11आणि 12 ह्या दोन दिवसांकरिता थोडी शिथिलता देण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यास आदेश देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. नियोजन भवन येथे आज शुक्रवारी दिवसभर पालकमंत्र्यानी वाढत्या कोरोना विषाणू संदर्भात बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.ऐन रमजान ईद सणासमोर आणखीन कडक निर्बंध लादण्यात आल्याने पालकमंत्र्यानी बोलताना माहिती दिली.
जीवनावश्यक वस्तू खरेदी करायचे कसे?
या आठवड्यात रमजान ईद आहे. ईद काळात कडक संचारबंदी लागू करणे अयोग्य आहे. आम्ही घरात राहून ईद साजरा करू. पण, ईदला आवश्यक साधनसामग्री आणायची कुठून? त्यामुळे ८ ते १५ मे दरम्यान लागू झालेली कडक संचारबंदी शिथिल करा, अशी मागणी शहरातील विविध मान्यवरांनी पालकमंत्र्यांकडे केली होती. याकरिता पालकमंत्र्यांवर शुक्रवारी सकाळपासून दबाव वाढत होता.
मुस्लिम बांधवांनी केली शिथिलतेची मागणी..
या बैठक दरम्यान मुस्लिम समाजातील मान्यवरांनी नियोजन भवनासमोर गर्दी करून कडक संचारबंदी शिथिल करा, अशी मागणी केली. बैठकीदरम्यान शहर काझी अमजद अली हे पालकमंत्र्यांना भेटून १५ मे नंतर संचारबंदी लागू करा. त्यापूर्वी लागू केलेली संचारबंदी शिथिल करा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. याबाबत पालकमंत्र्यानी सकारात्मक निर्णय न घेतल्यास समाजातील मान्यवरांची बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरवू. धोरण ठरवू, अशी माहिती शहर काझी यांनी नियोजन भवनासमोर पत्रकारांशी बोलताना दिली.
पालकमंत्र्याचे आश्वासन-
प्रमुख अधिकाऱ्याशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या कडक निर्बंधाला मुस्लिम समाजाकडून विरोध होत असल्याचे लक्षात आले आहे. म्हणून आठ मे पासून लादण्यात आलेले निर्बंधादरम्यान मुस्लिम समाजाचा पवित्र सण येत असल्याने 11आणि 12 मे या दोन दिवसा करिता जिल्हा प्रशासनाकडून शिथिलता देण्यासंदर्भात आदेश दिल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.