सोलापूर - करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी न घेतलेले कर्ज माफ मात्र, घेतलेले कर्ज तसेच हा मुद्दा चांगलाच पेटला आहे. याबाबत रयत क्रांती संघटना फसवणूक झालेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करणार आहे. तसेच फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आव्हान रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य अजय बागल यांनी केले आहे. याबाबत तहसीलदार समीर माने यांना रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआयच्या वतीने निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांसाठी 2 लाखाच्या आतील महात्मा फुले कर्जमाफी योजना लागू करण्यात आली आहे. याचा सर्व लाभार्थ्यांना लाभ होत आहे. यामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांचा जास्त प्रमाणात समावेश आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांनी दिलेल्या सातबारा, स्टॅम्प, बँक पासबुक हे खत आणि बियाणे घेण्यासाठी दिले होते. परंतू त्यांनी त्याचा गैरफायदा घेऊन बँकांना हाताशी धरून त्यांच्या नावावर एक लाख ते दीड लाखाचे कर्ज घेतले होते.
हेही वाचा - केम गावातून पहिली मुलगी सैन्यात दाखल, पंचक्रोशीतून कौतुकाचा वर्षाव
या शेतकऱ्यांनी सोसायटी आणि बँकेमार्फत घेतलेले कर्ज पण एक ते दीड लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ त्यांना कोणत्याही एकाच कर्जावर मिळणार आहे. परंतू त्यांनी शेतकऱ्यांकडून कर्जमाफीसाठी सहया घेऊन कारखान्यांची कर्जमाफी करून घेतलेली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून गोरगरीब शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करावी. या मागणीचे निवेदन तहसिलदार समीर माने यांना रयतक्रांती संघटनेच्यावतीने देण्यात आले.
हेही वाचा - माढा नगरपंचायत ठरली देशात पहिली; घरावर कुटुंबप्रमुखाच्या जागेवर महिलांच्या नावाच्या 'पाट्या'
यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. याला राष्ट्रीय समाज पक्ष आणि आरपीआयने पाठिंबा दिला आहे. यावेळी अजय बागल, अंगद देवकते, बाळासाहेब टकले, अर्जुन गाडे, शिवशंकर जगदाळे, अंगद लांडगे, नरेंद्रसिंह ठाकूर, ज्ञानदेव काकडे, महादेव सुळ, अशोक पोळके उपस्थित होते.