सोलापूर - शहरात रॅपिड अँटिजेन टेस्टला आजपासून सुरुवात झाली आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच को-मॉर्बिड नागरिकांची टेस्ट करण्यात येणार आहे. जोडभावी पेठेतील नागरी प्राथमिक केंद्रात पहिली टेस्ट घेण्यात आली. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीमध्ये पहिली टेस्ट घेण्यात आली.
सोलापूर शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोलापूरात येऊन बैठक घेतली होती. या बैठकीत शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी असलेल्या व्यक्तीची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याच्या सूचना केल्या होत्या. यामध्ये सोलापूरातील सुरूवातीच्या टप्य्यात एक लाखापेक्षा जास्त टेस्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर सोलापूरात रॅपिड ॲटिजेन टेस्टला आज सुरवात करण्यात आली. जोडभावी पेठ येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आज पहिली टेस्ट घेण्यात आली.
अँटिजेन टेस्टमुळे अर्धा तासातच कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही, याची माहिती कळणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचे झटपट अलगीकरण करणे, त्याच्यावर उपचाराची सुरुवात करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या विषाणूचा प्रसारही रोखण्यास मदत होणार आहे, असे सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी यांनी सांगितले.