पंढरपूर - माळशिरस तालुक्यामध्ये एका मुलीला 'तुझ्या प्रियकराकडून तुला पैसे मिळवून देते' असे आमिष दाखवून, प्रियकराच्या कुटुंबाला 15 लाखांची खंडणी मागणाऱ्या अकलूजच्या ग्रामपंचायत सदस्य ज्योती कुंभार यांच्याविरुद्ध अकलूज पोलीस स्टेशनमध्ये खंडणी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकराच्या कुटुंबीयांकडून त्यांनी 15 लाखांपैकी सव्वा लाखांची खडणी घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील लवंग येथील एका तरुणाने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची तक्रार संबंधित मुलीने 18 मार्चला अकलूज पोलीस स्टेशनमध्ये केली होती. या तक्रारीनंतर तरुणावर लैंगिक अत्याचार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तरुणाची चौकशी सुरू असताना, ज्योती कुंभार यांनी तरुणाच्या कुटुंबाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
अकलूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या ज्योती कुंभार यांनी सदर मुलीस तुला तुझा प्रियकर मिळून देते, व त्याच्याकडून 15 लाख रुपये देखील घेऊन देते असे सांगितले. त्यानंतर त्यांनी संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांकडे 15 लाखांची मागणी केली होती. त्यातील 1 लाख 25 हजार रुपये ज्योती कुंभार यांना देण्यात आले, दरम्यान खंडणीच्या मागणीसाठी कुंभार यांनी या तरुणाच्या कुटुंबीयांना मारहण देखील केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कुंभार यांच्याविरोधात खंडणी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंभार यांना न्यायालयाने 24 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.