करमाळा (सोलापूर) - केशरी कार्ड असून देखील गेल्या सात महिन्यांपासून अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसल्याने रांझणी (भीमानगर) गावातील महिलांनी माढा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील-भीमानगरकर, सरपंच मंदाकिनी दतात्रय पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या कक्षात महिलांनी प्रवेश करीत घोषणाबाजी करून ठिय्या दिला.
दीड महिन्यांपूर्वी देखील या गावच्या महिलांनी तहसील कार्यालयात निवेदन देऊन हा प्रश्न तहसीलदार यांच्या समोर मांडत ग्रामपंचायतीचा ठराव आणि इतर कागदपत्रे दिली होती. मात्र, हा प्रश्न अजूनही अंधातरीतच राहिला आहे. रांझणी (भीमानगर) गावातील केवळ ८४ लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत आला असून गावातील इतर १३३ लाभार्थ्यांचे ४४ हजारांच्या पेक्षा उत्पन्न कमी आहे, असे असताना देखील लाभार्थी धान्याच्या प्रतीक्षेतच आहेत. सर्व कागदपत्रांची पुर्तता करून केशरी कार्ड मिळाले, मात्र ते शोभेची बाहुली ठरत आहे. कार्ड असून तर फायदा काय? गेल्या सात महिन्यांपासून कसलेही धान्य मिळालेले नसल्याने प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झालेल्या महिलांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्या समोर प्रश्नांची सरबत्ती केली.
हेही वाचा - 'कोरोनाबाधित व्यवसायिक अन् शेतकऱ्यांना अनुदान द्या'
एका महिन्याच्या आत आम्हाला आमच्या हक्काचे धान्य द्या, अन्यथा तहसील कार्यालयाचा कारभार बंद करू, असा इशारा महिलांनी यावेळी रेशन कार्ड हातात धरून दिला. तहसीलदार उपस्थित नसल्याने महिलांची मागणी ऐकून घेत त्यांचे निवेदन नायब तहसीलदार आर. बी. पतंगे, तालुका पुरवठा अधिकारी आर.आर. कदम यांनी स्वीकारले. हा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर महिला तहसीलदार कक्षाबाहेर आल्या. या वेळी माजी जि.प. सदस्य संजय पाटील-भीमानगरकर, सरपंच मंदाकिनी पाटील, विमल गायकवाड, नेताजी चमरे, संगिता पाटोळे, आरिपा शेख, मैनाबाई नगरे, शमा पठाण, सुवर्णा खानेवाले, शांताबाई पवार, रोहिणी लोंढे, मंगला नगरे, जनाबाई नगरे, नागरबाई सल्ले, दत्तात्रय पाटील, नितीन मस्के आदींसह अन्य महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
अन्यथा तहसील कार्यालयाचा कारभार बंद करू-
रेशन कार्डच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांच्या उपस्थितीत संजय पाटील-भीमानगरकर यांनी माढ्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. एका महिन्याच्या आत तहसील प्रशासनाने कार्यवाही करून लाभार्थ्यांना धान्य मिळवून द्यावे, अन्यथा महिलांच्या हजेरीत तहसील कार्यालयाच्या गेटला कुलूप लावून तहसील कार्यालयाचा ताबा घेऊन कारभार बंद करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.