पंढरपूर (सोलापूर) - भारतभर आज रक्षाबंधन सण साजरा केला जात आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज जवळच्या श्रीपूर येथील शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांनी व परिसरातील महिला भगिनींनी देशाच्या सीमेवरती रक्षण करत असलेल्या सैनिकांना, पोलिसांना, जवानांना व कोविड सेंटरमध्ये दिवस-रात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांना श्रीपूरच्या पोस्टमधून राख्या पाठवल्या. गेल्या अनेक वर्षापासून शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान सैनिकांसाठी, पोलिसांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे.
श्रीपूर ते नवी दिल्ली पोहोचल्या राख्या
देश रक्षण करत असताना पोलिसांना, सैनिकांना कुटुंबामध्ये एकत्रित सण साजरे करता येत नाहीत. म्हणून प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुरेखा जाधव, उपाध्यक्षा सविता नाईकनवरे, सचिव सारिका नाईकनवरे, सदस्य विजया नाईकनवरे, करुणा धाइंजे, कांचन देवडकर, सारिका मोहिते, रंजना अडसूळ या महिला भगिनींनी राख्या एकत्रित करून श्रीपूर पोस्टामधून नवी दिल्ली, गडचिरोली, हरियाना, तळेगाव पुणे, भोपाळ, श्रीपूर कोविड सेंटर, अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी राख्या पाठवल्या.
देशाच्या सीमेवरील जवान, पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून देश संरक्षण करत असतात. तर कोविंड सेंटरमध्ये डॉक्टर व सर्वच कर्मचारी जीवाची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करत आहेत. रुग्णसेवा देत आहेत. हे सर्वजण कर्तव्य बजावताना अनेक सण, उत्सव यांच्यापासून वंचित राहत असतात. त्यांना सेवेच्या ठिकाणी राखी पौर्णिमा साजरी करता यावी म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने राख्या पाठवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक शुभेच्छापत्र देखील पाठवले आहे. यातून बहिण-भावाचे नाते अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.
पोस्ट विभागाकडून राखी पाठवण्यासाठी स्वातंत्र्य यंत्राणा
श्रीपूर पोस्टाने राख्या पाठवण्यासाठी वेगळी स्वतंत्र यंत्रणा उभा केलेली आहे. सुट्टीचे दिवस असतानासुद्धा राख्या कशा लवकर जातील याचे देखील येथील पोस्टमास्तर अंबादास पालेमूळ, बोगे मास्तर, पी.जी दीक्षित, पांडुरंग भालेराव, ज्ञानेश्वर सावंत, संजय फुलबडवे, पोस्टमन बापू कचरे, विठ्ठल सुरवसे, शंकर रेडे, कृष्णा भाग्यवंत या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यवस्था केली आहे. राख्या पाठविण्याची पोस्टामध्ये चांगल्या प्रकारे सोय केल्यामुळे महिला भगिनींमधून त्यांचे कौतुक केले जात आहे.