सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात आज 22 फेब्रुवारी रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्याबाबतची माहिती माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोलापुरात दिली आहे. या संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी आम्हा शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनाला आडकाठी आणण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी चक्काजाम : राज्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि आवश्यक तेवढी वीज उपलब्ध करून दिली जात नाही. काही मोजक्या जिल्ह्यात दिवसा वीजपुरवठा होतो. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांना रात्री वीजपुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांच्या वीजबिलात 37% वाढ केली आहे. मुळात शेतकरी आर्थिक अडचणीत असताना विज वितरण विभाग आणि महावितरण यांच्यावतीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची सुलतानी कारवाई सुरू आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमीभाव मिळत नाही, सोलापुरात कांदा, साखर यासारख्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही, अशा शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी पत्रकार परिषदेत मांडल्या.
कवडीमोल किमतीत शासनाकडून जमिनी संपादीत : सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग जातो. त्या रिंगरोड रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनी कवडीमोल किमतीने शासनाकडून संपादीत केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा अशी आमची मागणी आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये कापसाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. अतिवृष्टी, पिक विमा, दूष्काळ, याची नुकसान भरपाई शासनाने शेतकऱ्यांना दिलेली नाही. अशा अनेक विषयावर राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.
आंदोलन दुपारी 12 नंतर : पोलिसांनी आडकाठी आणल्यास जशास तसे उत्तर देऊ. सोलापूरसह राज्यातील विविध महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी शेतकऱ्यांना घेऊन रास्ता रोको करणार आहेत. बारावीच्या परीक्षा असल्याने चक्का जाम आंदोलन हे दुपारी 12 नंतरच सुरु होईल. पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना जशास तसे उत्तर देणार असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.