सोलापूर - जिल्ह्याला गेल्या आठवड्यात अतिवृष्टीने झोडपले होते. त्यानंतर आठवडा भराची विश्रांती घेतलेल्या पावसाने जिल्ह्यातील काही भागात जोरदार हजेरी लावली. दसऱ्याच्या दिवशी सोलापूर शहरासह उत्तर सोलापूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे ओढे नाले पुन्हा एकदा प्रवाहित झाले आहेत. तिऱ्हे गावात पाणी फाउंडेशने केलेल्या कामामुळे या पावसाळ्यात तिऱ्हे गावातील गारभवानी परिसरमात्र जलयुक्त झाला आहे. पाणी फाउंडेशनच्या वतीने खोलीकरण केल्यानंतर पहिल्यांदाच हा ओढा भरून वाहू लागला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गाव परिसरात रविवारी पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. त्यामुळे आठवडाभरापूर्वी सीना नदीच्या महापुराचे ओसरलेल्या पाणी-पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. तसेच गावातील गारभवानी परिसरातून ओढ्यातूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या माहितीनुसार सुमारे १५ वर्षापूर्वी हा ओढा पावसाळ्यानंतरही ३ महिने वाहात होता. त्यानंतर मात्र पर्जन्यमानाचे प्रमाण कमी झाल्याने ओढा वाहने बंद झाले होते.
पाणी फाउंडेशनचा पुढाकार-
या परिसरात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली होती. शेतकऱ्याचे बोअरवेलही कोरडे पडू लागले होते. त्यानंतर जलयुक्त शिवार योजने अंतर्गत पाणी फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आतिष शिरगिरे, विश्वास गायकवाड यांच्या नेतृत्वात हा ओढा खोल आणि रुंद करण्याचे काम २०१८ मध्ये हाती घेण्यात आले. पाणी फाउंडेशनच्या नियोजनाने हा ओढा जागोजागी बांध घालून अडवण्यात आला. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण फारसे नसल्याने ओढ्यातून पाणी वाहिले नाही. मात्र, यंदा झालेल्या झालेल्या अतिवृष्टीने गारभवानी ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले असल्याची माहिती शेतकरी गोविंद सुरवसे यांनी दिली.
तसेच रविवारी झालेल्या दमदार पावसामुळे हा ओढा आता काठोकाठ भरला असून पाणी जमिनीत मुरल्याने ओढ्याकाठच्या विहिरी, विधंनविहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे यंदा उन्हाळ्यात विहिरी बोअरवेल कोरडे पडण्याच्या प्रकारापासून मुक्तता होईल, अशी आशा शेतकऱ्यामधून व्यक्त केली जात आहे. दरम्यान पाणी गारभवानी ओढा वाहू लागल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.