पंढरपूर - पुणे व सातारा जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे धरणात आता 74 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून 32 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग निरा नदीत करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना जलसंधारण विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उजनीची शंभरीकडे वाटचाल
गेल्या महिन्यामध्ये पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण 64 टक्के भरले होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे आठ दिवसात उजनी धरणाची पाणीपातळी 74 टक्क्यांवर गेली आहे. पुणे जिल्ह्यातील पानशेत, चासकमान, पवना, डिंभे ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे या धरणातून सोडण्यात येणारे पाणी उजनी जलाशयामध्ये येऊन पडत आहे. त्यामुळे उजनी धरण लवकरच 100 टक्के भरेल, असा विश्वास शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे.
वीर धरणातून निरा नदीत 32 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
सातारा जिल्ह्यातील वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. वीर धरण शंभर टक्के भरले असल्यामुळे निरा नदीमध्ये बत्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. निरा नरसिंगपूर येथे भीमा नदी पात्रात येऊन नीरा नदीचा संगम होतो. त्यामुळे भीमा नदीत पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंधारण विभागाकडून भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.