सोलापूर - कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी विविध वैद्यकीय सामग्री खरेदीसाठी जिल्हा विकास निधीतून (डीपीसी) तीन कोटी 73 लाख रुपयास पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.
शंभरकर यांनी सांगितले, की जिल्हा विकास निधीतून श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयास (सिव्हील हॉस्पिटल) आणि जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय यांना विविध वैद्यकीय सामग्री आणि साहित्य खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिष्ठाता यांना 161.68 लाख तर जिल्हा शल्यचिकित्सक यांना 211.99 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या निधीतून पाच व्हेंटिलेटर, 22 मल्टीपॅरा मोनिटर, 20 थरमल स्कॅनर, 17 डिफॅब्रीलिटर, 17 पल्स ॲक्सोमिटर, 34 अल्ट्रॉसोनिक नेब्युलायझर, 100 फाऊलर बेड आदी साहित्य सामग्री व विषाणू प्रार्दुभाव रोखण्यासाठी खरेदी केली जाणार आहेत.
जिल्हा विकास निधीतून आणखी गरज भासल्यास पैस उपलब्ध करून दिले जातील, असे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आश्वस्त केले आहे, असे शंभरकर यांनी सांगितले.