सोलापूर- मंगळवेढा नगर पालिकेच्या नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. तर, मंगळवेढा नगर पालिकेच्या ११ नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. त्यात आणखी भर म्हणून कर्मचाऱ्यांनी देखील आंदोलन सुरू केले आहे. या सर्वांमुळे मंगळवेढा नगर पालिकेमध्ये आंदोलनाची खिचडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या आंदोलनाच्या खिचडीमुळे मंगळवेढा पालिकेत नुसता गोंधळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवेढा नगर पालिकेतील १७ नगरसेवकांपैकी १२ नगरसेवकांनी नगराध्यक्षा अरुणा माळी यांच्या मनमानी कारभारा विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर, दुसरीकडे नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या एकाधिकारशाही विरोधात पालिकेसमोरच उपोषण सुरू केले आहे. यात भरीस भर म्हणून मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या समर्थनार्थ येथील कर्मचाऱ्यांनीही आंदोलनात उडी घेत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे पालिकेचे कामकाज दोन दिवसांपासून ठप्प झाले आहे. तसेच येथील पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपोषणामुळे नगर पालिकेचा कारभार ठप्प पडला आहे.
हेही वाचा- मंकी हिल-कर्जत स्थानकादरम्यान ‘अप लाइन’ वर तांत्रिक कामांमुळे 'या' गाड्या रद्द