पंढरपूर (सोलापूर) - माळशिरस नगरपंचायतीत रस्ते व गटारीचे बांधकाम पूर्ण केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील तीस हजार रुपयांची लाच घेताना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारास सोलापूर लाचलुचपत पथकाने रंगेहात पकडले आहे. माळशिरस नगरपंचायत प्रशासकीय इमारतीत लाच घेत असताना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार देविदास बाळासाहेब कावळे तीस हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. माळशिरस शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉन्ट्रॅक्टदाराकडून लाचलुचपत विभागाकडे तक्रार
माळशिरस नगरपंचायत, माळशिरस अंतर्गत एप्रिल 2021 मध्ये सार्वजनिक रस्त्याच्या निविदा निघालेल्या होत्या. या निविदा मंजुर झालेले निविदाधारक यांच्यासोबत उप कंत्राटदार म्हणून तक्रारदारांनी करार करुन रस्त्याचे व गटारीचे बांधकाम पूर्ण केले होते. कामाचे बिल मंजूर करून घेण्यासाठी तक्रारदार माळशिरस नगरपंचायतीच्या कार्यालयात पाठपुरावा करीत होते. करारानुसार पूर्ण केलेल्या कामाचे बिल मंजुरीच्या अनुषंगाने तक्रारदाराच्या कामाचे मोजमाप करून त्याचे बिल मंजुरीसाठी अहवाल मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी व ते मंजूर करण्यासाााठी कावळे यांनी एक लाखाच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रारदाराने तक्रार दिली होती.
रकमेतील तीस हजारांची लाच स्वीकारताना जाळ्यात
रस्ते व गटारीच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कावळे यांनी एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. 70 हजार रुपयांवरून तडजोड करण्यात आली व त्यातील पहिला हप्ता तीस हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले. मात्र, कंत्राटदाराने सोलापूर लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली. माळशिरस नगरपंचायत प्रशासकीय इमारतीमध्ये तीस हजार रुपयांची लाच घेताना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कावळे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस अंमलदार प्रमोद पकाले, स्वप्नील सन्नके यांच्या पथकाने केली.
हेही वाचा - अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय मार्फत चौकशी करा; चंद्रकांत पाटील यांचे अमित शहांना पत्र