सोलापूर - भारतात सर्वत्र रोजगारासाठी हाहाकार माजलेला आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेतून मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षित तरुणाईचे लोंढे बाहेर पडत आहेत. या तरुणाईमध्ये रोजगार मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे. गुणवत्ता, पात्रता आणि योग्यता असणाऱ्या हजारातून एकाला रोजगाराची संधी मिळत आहे. हि विषमता आणि बेरोजगारी देशाच्या आर्थिक अरिष्टाचे द्योतक आहे. यातून विषमता आणि बेरोजगारापासून मुक्ती म्हणजे खरी देशभक्ती असे मत मार्क्सवादी विचारवंत, ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
रविवार दिनांक १९ जानेवारीला सकाळी ११ वाजता दत्त नगर येथील सिटू कार्यालयात कामगार-शेतकरी-शेतमजूर भातृभाव दिनाचे औचित्य साधून सिटूच्यावतीने प्रा. अजित अभ्यंकर लिखित बंद करा सट्टाबाजार, बंद करा भावनांचा व्यापार “अबकी बार सिर्फ रोजगार” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा - अमरावतीच्या सायकल मॅरेथॉनमध्ये खासदार नवनीत राणांनी चालवली सायकल
जगाच्या पाठीवर सध्या १५ ते २९ वयोगटातील तरुणांची संख्या सगळ्यात मोठी आहे. या दृष्टीने मनुष्यबळ, श्रमशक्ती, बौद्धिकता, उत्पादकतेची उपलब्धता आहे. परंतु याचा वास्तवात वापर होत नाही. म्हणून देशात २५ टक्के बेरोजगारी अर्थातच देशातील दर ४ युवकांत एक बेरोजगारीचे प्रमाण आहे. याला येथील शिक्षण व्यवस्था कारणीभूत आहे. खाजगी शिक्षण सम्राटांनी शिक्षणाच्या दर्जाची धूळधाण केल्याचा आरोप अभ्यंकर यांनी केला आहे.
हेही वाचा - 'देश मोदी चालवतात की मोहन भागवत ?'
सुरुवातीस प्रास्ताविक सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख यांनी भातृभाव दिनाचे महत्व व आगामी कार्यक्रम विषद केले. त्यानंतर किसान सभेचे राष्ट्रीय नेते कॉ. सिद्धप्पा कलशेट्टी, सिटू राज्य सचिव कॉ. वसंत पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी युवकांच्या रोजगारासाठी आता सरकारशी दोन हात करा असे म्हणाले.