पंढरपूर - नारायण चिंचोली गावात मिरवणुकीमध्ये फटाके फोडण्याच्या वादातून दोन गटात तुंबळ मारहाण झाली. भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती-जमातीचे नूतन जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे यांच्या मिरवणुकीमध्ये दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली. यामध्ये दोन जण गंभीर तर काहीजण किरकोळ जखमी झाली आहेत. दोन्ही गटांकडून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरवणुकीदरम्यान तुंबळ मारहाण-
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सोलापूर भाजप जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. अनुसूचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष म्हणून पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील लक्ष्मण धनवडे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर नारायण चिंचोली या गावात धनवडे यांच्या मिरवणुकीदरम्यान फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटात चाकू आणि दगडाने परस्परांविरुद्ध तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटातील सदस्य या मारहाणीत जखमी झाले आहेत.
गावात तणावपूर्ण शांतता-
याबाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटांनी परस्परविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील आठ जणांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही गटातील वाद झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अशोक जाधव करत आहेत.
हेही वाचा- 'नीट राहा, नाहीतर गोळ्या घालीन' शेतकरी नेते अजित नवलेंना धमकी