सोलापूर - बार्शीतील बनावट नोटा छापण्याच्या प्रकरणात आणखी एक प्रिंटर आणि काही नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी पुण्यातून हा प्रिंटर ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बार्शी तालुक्यात शंभर रूपयांच्या चलनी नोटा छापून त्या चलनात आणणारी टोळी कार्यरत होती. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला होता. प्रिंटरवर नोटा छापून त्या चलनात आणल्या जात होत्या. पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे.
हेही वाचा - बार्शीत बनावट नोटा बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, आणखी एक प्रिंटर पोलिसांना मिळाला आहे. पुण्यातील धायरी येथून हा प्रिंटर पोलिसांनी ताब्यत घेतला आहे. यामध्ये एका बाजूने नोटाची प्रिंट असलेल्या काही शंभर रुपयांच्या नोटाही मिळाल्या आहेत.
बनावट नोटा तयार करणारी ही टोळी पुण्यात प्रिंटरच्या सहाय्याने नोटा छापत होती. नोटा छापत असताना कोणालाही संशय येऊ नये म्हणून सुरुवातीला फक्त 100 रूपयांच्या नोटा छापण्यात आल्या. या नोटा छापल्यानंतर त्या चलनात आणण्यासाठी ही टोळी बार्शी तालुक्यात आली होती. संशय आल्याने पोलिसांनी सुरूवातीला टोळीतील एकाला ताब्यात घेतले होते.