सोलापूर - पंढरपूरचे अखंड दैवत असणाऱ्या विठुरायाच्या एकादशी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. विठुरायाचे सावळे रूप एकादशी दिवशी खुलून दिसण्यासाठी विठ्ठल मंदिर समितीकडून बंगळुरू येथून विठ्ठल व रुक्मिणी मातेचा पोशाख तयार करण्यात आला आहे. यामध्ये विठुरायासाठी अबोली रंगाचा कट, तर मोती रंगाची अंगठी तयार करण्यात आली आहे. रुक्मिणी मातेसाठी महावस्त्र तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे, आषाढी एकादशीला श्री. विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप अधिकच खुलून दिसेल, असे प्रतिपादन विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
हेही वाचा - आषाढी वारी 2021 : कोरोनामुळे पंढरपुरात गर्दी नकोच, सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारचा निर्णय कायम
विठ्ठल मंदिर समितीकडून एकादशी सोहळ्याची जय्यत तयारी
पांडुरंगाचा आषाढी एकादशी सोहळा हा मर्यादित स्वरुपात पार पडणार आहे. त्यामुळे, विठ्ठल मंदिरातही काही मोजक्याच नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. विठ्ठल मंदिर समितीकडून एकादशी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये विठ्ठल मंदिराला नयनरम्य असे आरास तयार करण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी सभामंडपही तयार करण्यात आले आहे. सर्व मंदिर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यामुळे विठ्ठल मंदिर समितीकडून जय्यत तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जोशी यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मंदिर समितीकडून सत्कार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत विठ्ठलाची शासकीय पूजा करणार आहेत. त्यांच्यासोबत मानाचे वारकरी केशव कोलते व त्यांच्या पत्नी पूजेत सहभागी होणार आहेत. विठ्ठल मंदिर समितीच्या महापूजेच्या वेळी पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्यासह मंदिर समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. ही पूजा एकादशी दिवशीच्या पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी पार पडणार आहे. त्यानंतर विठ्ठल मंदिर समितीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला जाणार आहे. मंदिर समितीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा छोटेखानी कार्यक्रम पार पडणार आहे.
एसटी सेवा, खासगी बस सेवांना 9 दिवस पंढरीत बंदी
आषाढी यात्रा काळात एसटी बस किंवा खासगी बसद्वारे वारकरी व भक्त पंढरपुरात दाखल होतील. छोट्या मार्गाने किंवा चोरट्या मार्गाने लोक पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी करू शकतात. यामुळे 17 जुलै ते 25 जुलै या दरम्यान पंढरपूरकडे येणारी व पंढरपूरहून जाणारी एसटी सेवा, खासगी बस सेवा पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले. संचारबंदीच्या काळात पंढरपुरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - Ashadhi Wari २०२१ : आषाढीसाठी पंढरीत आज संतांच्या पादुका भेट