सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्याने साखर कारखाना परिसरात स्मशानशांतता आहे. कारखान्यातील कामगार हे बंद असलेल्या कारखान्यासमोर दुःखात बसले आहेत. बाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत राहत असलेल्या महिलांना देखील चिमणीचे दुःख आवरत नाही. सोलापुरातील राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते यांनी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत जाऊन महिलांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या आमदार प्राणिती शिंदे, माकप नेते नरसय्या आडम यांनी शनिवारी दुपारी साखर कारखाना येथे जाऊन सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
प्रणिती शिंदेंचे भाजपला चॅलेंज : कामगार वसाहतीत पोलिसांनी बंदुकीच्या धाकावर सर्व वसाहत रिकामी केली होती, अशी माहिती महिलांनी प्रणिती शिंदेंना दिली. प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर टीका करत, हा प्रश्न विधानसभेत लक्षवेधी म्हणून उपस्थित करणार आहे. सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना पोलिसांनी बंदुकीची भीती दाखवत वसाहती रिकामी केली होती. बाळंतीण झालेल्या महिलेला देखील त्या ठिकाणाहून हाकलून लावले, याबाबत तीव्र संताप प्रणिती शिंदेंनी व्यक्त केला. भाजपने सोलापुरात सहा महिने किंवा एक वर्षांत विमानसेवा सुरू करून दाखवा असे ओपन चॅलेंज केले आहे. चिमणी पाडकामाच सर्व खापर भाजपवर फोडला जात आहे.
विमानसेवा सुरू करून दाखवा : भाजपच्या लोकांनी वैयक्तिक दुश्मनी आणि राजकीय द्वेषातून सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडली. आता बघूयात किती दिवसात तुम्ही तुमची विमानसेवा सुरू करताय. बघूयात बोरामणी विमानतळासाठी निधी आणून विमानसेवा सुरू करतायत. मी लिहून देते की, त्यांना हे जमणार नाही, अशा शब्दांत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. सोलापुरातील चिमणी समर्थक हे फक्त भाजपविरोधात प्रतिक्रिया देत आहेत. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला भेट देत, विमानसेवा सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यातील सत्ताधारी व ५० खोकेवाले आणि भाजप सरकार हेच जबाबदार आहे. आम्ही काडादी तसेच सभासद शेतकरी, कामगारांना मदत करण्यासाठी तयार आहोत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
कामगारांच्या कुटुंबीयांचा टाहो : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात कामगारांची वसाहत आहे. चिमणी पाडून तीन दिवस झाले आहेत, आमच्या घरातील सदस्याचा मृत्यू झाल्याप्रमाणे दुःख पसरले आहे. तीन दिवस झाले चिमणीच्या दुःखात आम्ही चूल पेटवली नाही. प्रणिती शिंदे यांनी कामगारांच्या वसाहतीला भेट दिली असता, वसाहतीमधील महिलांना अश्रू अनावर झाले. चिमणी पाडण्या अगोदर अचानकपणे रात्री येऊन पोलिसांनी लोकांना घरातुन बंदुकीच्या धाकावर बाहेर काढले. हे सर्व भाजप सरकार करत आहेत, भाजपला पाडण्यासाठी कुठे यायचे सांगा, आम्ही स्वखर्चाने येऊ असे कामगार वसाहती मधील महिलांनी आमदार प्रणिती शिंदे समोर व्यथा मांडली.
हेही वाचा -