सोलापूर - जाती पातीचे राजकारण करत एका दररोज एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांना थारा देऊ नका असे वक्तव्य आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. मागास, अल्पसंख्याक, गोरगरिबांचे प्रश्न सोडवून त्यांना पुढे नेण्याचे काम केवळ काँग्रेसच करु शकते. त्यामुळे जनतेच्या सुखदु:खात सहभागी होणार्या काँग्रेसलाच मतदान करा असे आवाहनही यावेळी प्रणिती शिंदेंनी केले.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांचा प्रचार सुरू आहे. प्रणिती शिंदे यांचा भर हा मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी आणि कॉर्नर बैठकावर आहे. गुरूवारी मौलाली चौकनजीक ख्रिश्चन समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये त्यांनी जातीयवादी शक्तींना थारा देऊ नका असे, आवाहन केले.
हेही वाचा - सुशीलकुमार शिंदेच्या 'त्या' वक्तव्यावर काय म्हणाले अजित पवार?
हेही वाचा - 'इतकी वर्ष सडली आणि १२४ वर अडली', राज यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
या निवडणुकीत सत्ता, दलालीसाठी अनेक जण पक्षाशी बेईमानी करुन निवडणूक लढवत आहेत. या लोकांचे जनतेसाठी काहीच योगदान नाही. हे लोक या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आमिष दाखवून जनतेला भुलवण्याचा प्रयत्न करीत आहेत. कुठलेही काम नसणार्यांना मते मागण्याचा काय अधिकार? असा सवालही प्रणिती शिंदेंनी केला. मी केलेली विकास कामे हीच माझी जमेची बाजू असून, त्याच जोरावर निवडणूक लढत असल्याचे प्रणिती शिंदेंनी यावेळी सांगितले.
मुस्लीम समाज इंदिरा गांधींपासून काँग्रेससोबत आहेत. या निवडणुकीत भाजप-सेना, एमआयएमसारखे जातीयवादी पक्ष काँग्रेसच्या मतांचे विभाजन करु पाहात आहेत. मुस्लीम समाजाने जाती पातीला नव्हे तर काँग्रेसच्या हाताला साथ द्यावी, असे आवाहनही यावेळी शिंदेंनी केले.