पंढरपूर (सोलापूर) - आषाढी यात्रेत लाखो भक्तांना दर्शन देण्यासाठी पंढरीचा विठूराया अहोरात्र उभा असतो. आषाढी यात्रा सुरू झाल्यावर २४ जूनपासून मंदिरात ऑनलाइन २४ तास दर्शन सुरू आहे. यामुळे विठ्ठलाला थकवा न येण्यासाठी पाठीला लोड लावण्यात आला होता. अखंड उभे राहून दमलेल्या देवाचा शिणवटा काढण्यासाठी कित्येक वर्षांपासून परंपरेनुसार प्रक्षाळ पूजा केली जाते. गुरुवारी विठुरायाची प्रक्षाळ पूजा करण्यात आली. संस्थानचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते ही प्रक्षाळ पूजा केली गेली.
यावर्षी कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर आषाढी यात्रा रद्द करण्यात आली. त्यामुळे विठ्ठल मंदिरही बंद होते. मात्र, या कालावधीत भाविक दर्शनासाठी जरी आले नसले, तरी परंपरा म्हणून देवाला पाठीला लोड लावण्यात आले आणि आषाढी यात्रेच्या कालावधीत 24 तास उभे ठेवले होते. यावेळी देवाचे नित्योपचार देखील बंद ठेवले गेले होते. ते गुरुवारपासून सुरू झाले आहेत.
काय आहे प्रक्षाळ पुजा? -
आषाढी वारीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शेकडो तास अहोरात्र दर्शन दिल्यानंतर थकवा आलेल्या विठूरायाची प्रक्षाळ पूजा करण्याची परंपरा आहे. यासाठी विठूरायाला गरम पाणी आणि दही-दुधाने स्नान घालण्यात येते. गुरुवारी रात्री विठुरायाला आयुर्वेदिक काढाही देण्यात आला. यानंतर देवाचे नित्योपचार पूर्ववत सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे, ही पूजा पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक येत असतात. मात्र, विठ्ठल मंदिर बंद असल्यामुळे या वर्षी कोणत्याही भाविकाला पंढरपुरात प्रवेश देण्यात आला नाही. फक्त मानाच्या नऊ पालख्यांना प्रवेश दिला गेला. त्यांनाही प्रशासनाने नियमानुसार दोन दिवसांची परवानगी दिली होती.
हेही वाचा - औरंगाबाद शासकीय रुग्णालयात 'प्लाझ्मा थेरेपी' सुरू करण्यासाठी प्रयत्नशील : राजेश टोपे