सोलापूर - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरोनाच्या कॉलर ट्यूनवर आक्षेप घेतला. यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. गुरुवारी सकाळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘आपल्याला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही’, या कॉलर ट्यूनवर त्यांनी आक्षेप घेतला. तीन महिने झाले आहे ही रिंगटोन वाजत आहे. यामागील षडयंत्र काय आहे? हे मोदींनी स्पष्ट केले पाहिजे. कारण या रिंगटोनने अनेकांच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे, असे ते म्हणाले.
यापूर्वी अनेक महामाऱ्या येऊन गेल्या आहेत. या महामाऱ्यावेळी अनेक लोकांनी आपले जीव गमावले. त्यावेळी लॉकडाऊन करण्यात आले नव्हते. परंतु, यंदाच्या टाळेबंदीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. सर्वसामान्य जनता भीतीचे जीवन जगत आहे. मोलमजुरी करणाऱ्या गरीब मजुरांनी पलायन केले आहे. त्यामुळे 30 तारखेची वाट न बघता जनतेने सर्वसामान्य आयुष्य जगायला सुरुवात करावी. देशाच्या व राज्याच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे जनतेचे जीव वाचत आहे, लॉकडाऊनमुळे नाही, असे आंबेडकर म्हणाले. हे सरकार कंगाल झाले आहे. कच्च्या तेलाचे भाव कमी झाले असून देखील पेट्रोलचे भाव कमी झालेले नाही. भाव कमी करण्याऐवजी वाढवले जात आहेत, असेही ते म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणून मोठा कार्यक्रम घेण्यात आला. यामुळेच भारतामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी घणाघाती टीकाही आंबेडकर यांनी केली.