सोलापूर - वीज बिल असेच वाढले नाही तर ट्रायने दर वाढवल्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना भरमसाठ वीज बिले आली आहेत. वीज बिल मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. काँग्रेसचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत किंवा राज्य मंत्रिमंडळात असलेल्या इतर मंत्र्यांची बारामती समोर उभे राहण्याची हिम्मत नाही, अशी टीका करत अजित पवार यांच्यावर प्रकास आंबेडकर यांनी निशाणा साधला.
हेही वाचा - 'लॉकडाऊन हा पर्याय नाही; पण, प्रशासनाला वाटत असेल तर विरोध नाही'
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा शनिवारी सोलापूर दौरा आयोजित केला होता. दौऱ्यावर असताना त्यांनी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधला.
अजित पवार यांचा खोटारडेपणा समोर आला-
लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिलं माफ झाली पाहिजे अशी मागणी राज्यभरातून होत आहे. विधानसभेच्या अधिवेशनावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीरपणे आश्वासन दिले होते की, वीज कनेक्शन कट केले जाणार नाही. पण अधिवेशन संपताच पुन्हा वीज तोडणी सुरू झाली आहे. अधिवेशनात दिलेला शब्द न पाळल्यामुळे अजित पवार हे खोटारडे आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे.
हेही वाचा - VIDEO: जो बायडेन विमानाच्या पायऱ्या चढताना तीन वेळा घसरले
वीज बिल माफीला खरी अडचण बारामतीची-
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी थकीत वीज बिल माफीसाठी तसा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडला होता. पण राज्याचे अर्थमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार हे जाणीवपूर्वक ऊर्जा मंत्र्यांच्या प्रस्तावाला अडचण निर्माण करत आहेत. राज्याचे उर्जा मंत्री हे मागासवर्गीय असल्याने वीज बिल माफीच्या प्रस्तावाला विरोध होत असल्याची प्रतिक्रिया वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. थकीत वीज बिल माफीसाठी खरी अडचण बारामती आहे आणि मंत्रिमंडळात असलेले दुबळे मंत्री बारामतीत जाऊन उभे राहू शकत नाहीत, अशीही टीका यावेळी आंबेडकर यांनी केली आहे.
सरकारने वाढीव दर रद्द केले पाहिजेत-
लॉकडाऊन काळात महावितरणच्या वीज दरात वाढ झाली आहे. ही वीज दरवाढ ट्रायने केली आहे. वाढीव दराबाबत ट्राय कोर्टाकडून सुनावणी होणे अपेक्षित आहे. तरी देखील ठाकरे सरकारने वीज युनिटच्या दरात केलेली वाढ अगोदर सरकारने रद्द केली पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना केली आहे.
वीज तोडणीसाठी आलेल्या महावितरण अधिकाऱ्यांना बडवा - प्रकाश आंबेडकर
राज्यभर महावितरणकडून सक्तीची वीज वसुली सुरू आहे. ज्या ग्राहकांचे वीज बिल थकीत आहेत, त्यांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक होत उत्तर दिले की, वीज कनेक्शन कट करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना बडवा.
हेही वाचा - सरकारने वाढवली बेरोजगारी, महागाई आणि मित्रांची 'कमाई', राहुल गांधींचा केंद्रावर हल्ला