सोलापूर - सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील टोल नाका नकतेच सुरू करण्यात आला आहे. मागील अनेक महिन्यांपासून सोलापूर ते अक्कलकोट, असे रस्त्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाले, असे घोषित करून विकासक कंपनीचा टोल वसुली सुरू केली आहे. पण, रस्ता पूर्णपणे झाला नाही असे म्हणत स्थानिक नागरिका या टोल नाक्याला विरोध दर्शवत आहेत. टोल विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने टोल नाक्यावर मोर्चा काढण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षचे तालुकाध्यक्ष मोहसीन तांबोळी यांनी स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेत विविध मागण्या करत जवळपास एक तास टोल नाका बंद पाडला होता. या मोर्चामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा तोडफोड होऊ नये यासाठी या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
या आहेत मागण्या
सोलापूर-अक्कलकोट दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 150 चे विकास करताना विकासक कंपनीने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या आहेत. शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे त्यांचा मोबदलाही दिला गेला. अजूनही मोबदला देण्याचे काम सुरू असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली. पण, शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या वारसांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनात कायम नोकरी द्यावी, या प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी यापूर्वीच केली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना लवकरात लवकर नोकरी द्यावी तसेच रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसूल करू नये, या मागणीसाठी बुधवारी (दि. 22 सप्टेंबर) प्रहार जनशक्ती या संघटनेने अनेक शेतकऱ्यांनी टोल नाक्यावर मोर्चा काढला.
अन्याथा तोडफोड करुन टोल बसुली बंद करू
सोलापूर-अक्कलकोट दरम्यान आजही रस्त्याचे पूर्ण झाले नाही, असा आरोप प्रहारच्या वतीने करण्यात आला. आधी रस्ता पूर्ण करा आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्याच्या विकास कामासाठी गेल्या त्यांच्या मुलांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीस द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रस्त्याचे काम पूर्ण न करता टोल वसुली सुरू केल्यास टोल नाक्याची तोडफोट करुन टोल वसुली बंद पाडू, असा इशारा प्रहार संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला.
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची आंदोलनात उडी
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनीही आंदोलनात सहभाग घेत सक्तीच्या टोल वसुलीला विरोध केला. टोल प्रशासनाने टोल वसुलीसाठी गुंड ठेवले आहेत, जे वाहनधारकांना त्रास देतात, असा आरोप यावेळी सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला आहे. टोल प्रशासन जनतेला लुटत असेल तर आम्ही काँग्रेच्या वतीने मोठे जन आंदोलन करत आणि टोल बंद पाडू, असा इशारा यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिला.
हेही वाचा - ट्रक व चार चाकीच्या भीषण अपघात एक ठार तर दोघे गंभीर