सोलापूर - चोराला पोलीस पकडतात हे आजपर्यंत आपण ऐकले आहे. मात्र, अक्कलकोटमध्ये पोलिसांनाच चोरी करताना पकडण्यात आले आहे. अक्कलकोटच्या जुन्या पोलीस वसाहतीमध्ये लावण्यात आलेल्या वाळुच्या ट्रकचे चाक चोरून नेताना, सोलापूर शहर पोलीस दलातील शिपायासह तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तिघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - खून करून 'ती' गेली पोलीस ठाण्यात; गुन्हाची दिली कबूली
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या जेलरोड पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेला पोलीस शिपाई भाऊसाहेब शिंदे आणि अन्य तिघे काल (मंगळवारी) सायंकाळी अक्कलकोटच्या जुन्या पोलीस वसाहतीमध्ये आले. बेकायदा वाळू वाहतुकीच्या गुन्ह्यात ट्रक (क्र- एमएच 12 एयू 7937) जप्त करण्यात आला होता. ट्रकचे 40 हजार रुपये किंमतीच्या लोखंडी डिस्क व दोन चाक घेऊन जात होते. त्यावेळी हा प्रकार वसाहतीमधील पोलिसांच्या लक्षात आला.
अक्कलकोट पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता शहर पोलिसच चोर निघाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी जेलरोडचा लीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब ब्रह्मदेव शिंदे, सोमा विठ्ठल गायकवाड (रा.बोळकवठा ता. दक्षिण सोलापूर), गणेश मल्लेश मरेवाले आणि दयानंद बसवराज यळकर (रा.मंद्रुप ता.दक्षिण सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.