सोलापूर - पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनधारकांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला टेम्भुर्णी पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. ही महिती उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल हिरे व पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली.
रोहन देविदास ढवळे (वय24 वर्ष), रणजित बलभीम ढवळे (वय 23), महादेव विठ्ठल ढवळे ( वय 24 वर्ष तिघे राहणार दगड अकोले, ता माढा, जि सोलापूर), सोहम विठ्ठल म्हस्के (वय 20 वर्ष, रा शेवरे, ता माढा, जि सोलापूर), सुरज तुकाराम महाडिक(वय 19 वर्ष, रा मळेगाव, ता माढा, जि सोलापूर) अशी अटक केलेल्या संशयित दरोडेखोरांची नावे आहेत. पोलिसांनी या दरोडेखोरांना माढा तालुक्यातील दगड अकोले या ठिकाणाहून अटक केले आहे. प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक विठ्ठल म्हस्के यांच्या मुलाला देखील पोलिसानी संशयित दरोडेखोर म्हणून अटक केले आहे.
सांगोला या तालुक्यातुन मालट्रक क्र(यु पी 70 जी टी 7353) शनिवारी रात्री माढा येथील आकुंभे येथे डाळिंब भरण्यासाठी आला होता. रविवारी पहाटे ट्रकचालक रस्ता विसरला होता. त्यामुळे तो पुढे वरवडेपर्यंत गेला. वरवडे टोल नाक्या जवळून ट्रक वळवून जात असताना एका कार चालकाला ट्रक चालकाने रस्ता विचारला. ट्रकमध्ये बसून पुढे जाण्याच्या तयारीत असताना कारमधील दोघे ट्रकमध्ये चढले. त्यांनी चालकाच्या गळ्याला चाकू लावत पैशांची मागणी केली. चौघा संशयित दरोडेखोरांनी ट्रक चालकास मारहाण करून, दमदाटी करत त्याच्या खिशातून 38 हजार 500 रुपये व 5 हजारांचा मोबाईल असा एकूण 43 हजार 500 रुपयांचा रोख रक्कम व ऐवज जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रार दाखल केली होती. टेंभूर्णी पोलिसांनी ताबडतोब तपासाची चक्रे फिरवत रविवारी सकाळपर्यंत चार संशयित दरोडेखोरांना अटक केले. त्यांच्याकडून दोन स्विफ्ट कार देखील जप्त केल्या आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी रविवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या दरोडेखोरांना अटक करण्यात पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहायक फौजदार अशोक बाबर, हवालदार राजेंद्र डांगे, पोलीस नाईक दत्ता वजाळे,राजेंद्र ठोंबरे, धनाजी शेळके, महेश नीळ यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली.