बार्शी (सोलापूर) - राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. बार्शीतही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जाहीर केली. मात्र, पहिल्या दिवशी नागरिकांसह पोलीस प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने वृत्त प्रकाशित करताच शुक्रवारी सकाळपासून पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरून बंदोबस्त करीत होते. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी होती. शिवाय दुपारी 12 वाजेपर्यंत 80 नागरीकांवर कारवाई करण्यात आली.
बार्शी शहरासह ग्रामीण भागातही प्रादुर्भाव -
बार्शी शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरदिवशी 150 ते 200 रुग्णांचा कोरोनाच चाचणी अहवाल पॉझिटीव्ह येत आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे बार्शी तालुक्यात आहेत. त्याअनुषंगाने वाढत्या रुग्णांची साखळी तोडण्यासाठी जमावबंदीचे आदेश राज्य सरकारतर्फे देण्यात आले आहेत. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. मात्र, शुक्रवारी पोलीस शहरातील पांडे चौक, पटेल चौक, गांधी मार्केट याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई -
शहरातील रस्त्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. तसेच नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावरच उभ्या केल्या असल्याने पोलिसांनी 80 नागरिकांवर कारवाई केली. नागरिकांना वारंवार आवाहन करूनही जमावबंदीच्या आदेशाचे पालन न केल्यास कारवाई अटळ असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबईत ऑक्सिजनसाठी नोडल अधिकारी, ६ जण नियंत्रित करणार मुंबईचा ऑक्सिजन