सोलापूर - कोरोनाविरुद्धच्या लढाईत कोविड प्रतिबंधात्मक लस एक प्रभावी शस्त्र ठरत आहे. शासनाने लसीकरणाला प्राधान्य दिले असून प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण केंद्र कार्यरत करण्यात येणार आहे.
'तीस लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट'
सोलापुरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरूवातीच्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी तसेच फ्रंटलाइन वर्कर्स यांनाच लस देण्यात आली. आता मात्र ४५ वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या वयोगटातील जवळपास तीस लाख लोकसंख्येला लस देण्याचे जिल्ह्याचे उद्दिष्ट असल्याचे लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले आहे.
इतक्या केंद्रावर होणार लसीकरण
सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यात १३१ लसीकरण केंद्रावर लस देण्याचे काम सुरू आहे. यात १०५ शासकीय केंद्र तर २६ खासगी केंद्रांचा समावेश आहे. १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार असल्यामुळे ग्रामीण भाग आणि शहरी भागात मिळून ३३९ केंद्र कार्यरत करण्यात येईल. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ घेण्यात येणार आहे. तसेच खासगी औद्यागिक संस्थांना मागणीनुसार लसीकरण केंद्रांना परवानगी देण्यात येणार आहे. त्यांची माहिती संकलित केली जात आहे. लस देणारी मुख्य व्यक्ती प्राथमिक आरोग्य केंद्रातून तर कोविन ॲप हाताळण्यासाठी शिक्षक किंवा इतर कर्मचारी मानधनावर घेण्याचे नियोजन आहे.
'दररोज तीस हजार लसीकरण'
जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लस मिळण्यासाठी शासनस्तरावर मागणी नोंदविण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर रोज १०० याप्रमाणे ३३९ केंद्रावर दिवसाअखेर जवळपास तीस हजार लसीकरण होऊ शकते. मात्र,लसीचा साठा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाकडून नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे, असे डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले आहे.