सोलापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वयंनिधी योजनेंतर्गत शहरातील फेरीवाल्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी 10 हजार रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेने 5 हजार फेरीवल्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेत फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा व्यवसायाची उभारणी करावी, असे आवाहन सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.
गेल्या 4 महिन्यापासून जिल्ह्यासह देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांचे कंबरडे मोडले. यामध्ये रोजच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या फेरीवाल्यांचे मोठे नुकसान झाले. आधीच कुटुंबाची आर्थिक बाजू कमकुवत असलेल्या फेरीवाल्यांना लॉकडाऊनमध्ये अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागले. या पार्श्वभूमीवर स्वयंनिधी आत्मनिर्भर योजनेंतर्गत सोलापूर महानगरपालिका फेरीवाल्यांना कर्ज देणार आहे. या योजनेंतर्गत सोलापूर शहरातील 5 हजार फेरीवाल्यांना याचा लाभ घेता येणार आहे.
सोलापूर महानगरपालिकेमध्ये 3 हजार फेरीवाल्यांची नोंद झाली आहे. 3 हजारमधून 1 हजार फेरीवाल्यांनी रीन्यू केले आहे. उर्वरित फेरीवाल्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पूर्तता करून रीन्यू करावे, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. राहिलेल्या 2 हजार फेरीवाल्यांनी कागदपत्रे जमा करून नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून 10 हजार रुपयांचे भाग भांडवल उभे करून पुन्हा एकादा जोमाने व्यवसाय सुरू करता येईल. तसेच, ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून मोबाईलमध्ये किंवा इंटरनेटवर दिलेल्या संकेतस्थळावरून ऑनलाईन फॉर्म भरावे लागेल. शहरातील फेरीवाल्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
हेही वाचा- लोकमंगल समुहाच्या पुढाकारातून वडाळ्यात श्रीराम मंदिर, सुभाष देशमुखांच्या हस्ते भूमिपूजन