सोलापूर - पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या अकाली मृत्यूनंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर, दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या नावाचा आग्रह स्थानिकांकडून होत आहे. यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघामध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांनी बाहेरील उमेदवाराला विरोध दर्शवला आहे.
पार्थ की भगीरथ भालके
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी 2019 साली झालेल्या मावळ मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. पार्थ यांच्या जमेची बाजू म्हणजे, पवार घराण्याची मोठी राजकीय ताकद होय. 2019 च्या पराभवानंतर पार्थ पवार हे राज्याच्या राजकारणामध्ये कुठेही सक्रिय असताना दिसले नाही. त्यामुळे, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभामधून राष्ट्रवादी काँग्रेसची आमदारकी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर पार्थ पवार यांच्या उमेदवारीला विरोध होताना दिसत आहे. राजकीय जाणकारांकडून देखील पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत अफवा असल्याची बोलले जात आहे.
हेही वाचा - अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने आईनेच केला खून
भगीरथ भालके हे भारत नाना भालके यांचे सुपुत्र म्हणून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये परिचित आहे. भगीरथ भालके यांचा राजकीय जनसंपर्क थोड्या प्रमाणात आहे. मात्र, भारत नाना भालके यांच्या अकाली निधनामुळे भालके कुटुंबाविषयी मतदारसंघामध्ये सहानुभूतीची लाट आहे. याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विठ्ठल सहकारी कारखान्याच्या माध्यमातून भगीरथ भालके यांनी उमेदवारीसाठी आपली दावेदारी दाखवली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील बाहेरील उमेदवारांचा इतिहास
2009 आधी पंढरपूर-मंगळवेढा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. सुधाकरपंत परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दहा वर्षे आमदार म्हणून काम केले. मात्र, 2009 साली तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पेच निर्माण झाला होता. तो पेच सोडवण्यासाठी मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीकडून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, स्थानिक पातळीवर मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीला प्रचंड विरोध झाला होता. त्यावेळी पंढरपूर येथील स्थानिक नेते भारत नाना भालके यांनी भूमिपुत्र या मुद्द्याच्या बळावर निवडणूक लढवून मोहिते-पाटील यांचा दारुण पराभव केला होता. हा पराभव मोहिते-पाटील यांच्या जिव्हारी लागणारा ठरला.
राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे खंडन
पंढरपूरचे माजी आमदार औदुंबर अण्णा पाटील यांचे नातू अमरजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील नेत्यांनी व नागरिकांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीला पूर्णतः विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी या उमेदवारीचे पूर्णपणे खंडन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून देण्यात आली.
हेही वाचा - पंढरपुरात प्रेयसीच्या हौसेसाठी मोटरसायकल चोरणाऱ्या मजनूला अटक