सोलापूर - प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अतुल खुपसे यांची पक्षाने हकालपट्टी केली आहे. माढा तालूक्यातील उपळवटे येथील शेतकऱ्यांची जमीन लाटल्याप्रकरणी प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी खुपसे यांची पक्षातून हकालपट्टीची केली. मात्र, हकालपट्टी केली असल्याचा कोणताही आदेश आपल्याला मिळाला नसल्याचे अतुल खुपसे यांनी सांगितले आहे.
शिंदे यांना गोवण्याचा केला होता प्रयत्न-
माढा तालूक्यातील उपळवटे गावातील अतुल खुपसे यांचे घर जाळण्यात आले होते. हा प्रकार राष्ट्रवादीचे माढ्यातील लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांनी केला असल्याची तक्रार खुपसे यांनी केली होती. मात्र हा सर्व बनाव असून अतुल खुपसे यांनी गावातील शेतकऱ्यांची 17 एकर जमीन लाटली आहे. शेत जमिनीच्या कारणावरूनच हा हल्ला झाला होता. मात्र, खुपसे यांनी या प्रकरणात शिंदे यांना गोवण्याचा प्रयत्न केला होता.
या सर्व प्रकरणानंतर प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी पश्चिम महाराष्ट्र प्रमुखपदावरुन खुपसे यांची हकालपट्टी केली. शेतकऱ्याच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम करत असलेल्या व शेतकरी विरोधी धोरण आखत असल्यामुळे अतुल खुपसे यांची पक्षातून हकालपट्टी करत असल्याचे पत्र कडू यांनी काढले आहे.
‘प्रहार’च्या़ पदावरुन मला हटविण्यात आले आहे. ही माहीती मला सोशल मीडियातून मिळाली असून मला पक्षाकडून तसा कुठलाही आदेश अधिकृतरित्या प्राप्त झालेला नाही, असे स्पष्टीकरण अतुल खुपसे यांनी दिले आहे. उपळवाटे येथील घडलेला प्रकार हा राजकिय द्वेषातून मला त्रास देण्याच्या हेतूने घडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मी भाजपाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा प्रचार केल्यामुळे केवळ माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. माझ्या विरोधात मोठे कटकारस्थान केले जात आहे, अशी प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अतुल खुपसे यांनी दिली आहे.
माझा जमिनीबाबत न्यायालयात दावा सुरू आहे. माझ्या विरोधातील लोकांना हाताशी धरुन मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले असल्याचे खुपसे यांनी म्हटले आहे. मी घेतलेली जमीन भाडेपट्टा दरात लक्ष्मण डांगे यांच्याकडून 22/09/2008 रोजी 25 वर्षाच्या करारावर कसण्यासाठी रजिस्टर दस्तक करुन स्टॅम्प ड्यूटी भरून घेतलेली आहे. याचे पैसे मी वर्षाला कोर्टात भरत आहे. त्यामुळे मी शेतकर्यांवर अन्याय केला. हा आरोप खोटा असल्याचे अतुल खूपसे यांनी सांगितले आहे.