पंढरपूर/ सोलापूर - वारकऱ्यांच्या सावळ्या विठुरायाचा आषाढी सोहळा राज्य शासनाकडून मर्यादित स्वरूपाचा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून पायी वारी आणि दिंड्यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, मानाच्या 10 पालख्यांना पंढरपुरात परवानगी देण्यात आली. मानाच्या 10 पालख्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर तालुका प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. वाखरी पालखी तळावर पालख्यांच्या विसाव्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे.
सोमवारी तीन वाजेपर्यंत पालख्या वाखरी तळावर येणार
राज्य सरकारकडून पायी दिंड्यांना परवानगी न देता एसटी बसच्या माध्यमातून 10 मानाच्या पालख्या पंढरपुरात आणण्याची परवानगी दिली आहे. या पालख्या सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत वाखरी पालखी तळावर येणार असल्याची माहिती तालुका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामध्ये संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह सर्व मानाच्या पालख्या वाखरी पालखी तळावर उतरणार आहेत. या ठिकाणी तालुका प्रशासनाकडून पालखी विसावा म्हणून प्रत्येक पालखीसाठी एक मंडप, वैद्यकीय सुविधा असणारे कक्ष, तसेच इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत.
पालखीसह चारशे वारकऱ्यांना प्रवेश
वाखरी पालखी तळावर तालुका प्रशासनाकडून कोरोना नियमांचे सर्व पालन केले जात आहे. वाखरी पालखी तळावर तीस एकर परिसरात पूर्णपणे बंदोबस्त करण्यात आला आहे. यामध्ये मानाच्या पालख्यांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. पालखीसह चारशे महाराज मंडळी व वारकऱ्यांना वाखरी तळावर प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर वाखरी ते पंढरपूर या सहा किलोमीटरवर पायी दिंडीला परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
19 जुलैला निवृत्ती महाराजांची जाणार पंढरीला
संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा प्रस्थान सोहळा पौर्णिमेच्या मुहूर्तावर 24 जूनला पार पडला. त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे नाथ महाराजांच्या पालखीने प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान केले. 19 जुलैपर्यंत ही पालखी येथेच असणार आहे. 19 जुलैला पालखी शासनाच्या नियमानुसार दोन बसमधून पंढरपूरला जाणार आहे. यावेळी पालखीसोबत ठराविकच वारकरी असणार आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे वेळापत्रक
- प्रस्थान सोहळा - २ जुलै रोजी पार पडला.
- पहाटे ४ ते ५.३० : घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती झाली.
- सकाळी ९ ते ११ : वीणा मंडपात कीर्तन झाले.
- दुपारी १२ ते १२.३० : गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व महानैवेद्य झाला.
- सायंकाळी ४ वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रम पार पडला.
- सायंकाळी ६ वाजता माऊलींची पालखी मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून आजोळघरी मुक्कामी गेली.
- ३ ते १९ जुलैपर्यंत आजोळघरीच माऊलींच्या पादुकांवर परंपरेनुसार सर्व नैमित्तिक उपचार होणार.
- १९ जुलैला माऊलींच्या चलपादुका सकाळी १० वाजता एसटी बसने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार.
- १९ ते २४ जुलै : माऊलींच्या पादुका पंढरपूरमध्ये मुक्कामी असणार.
- २४ जुलै : पौर्णिमेला काला समाप्तीनंतर पंढरपूरहून आळंदीकडे एसटी बसने परतीचा प्रवास.
संत तुकाराम महारांच्या पालखीचे वेळापत्रक
1 जुलै 2021 रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला. दुपारी 2 वाजता पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. दरम्यान, 19 जुलै रोजी सकाळी 9 वाजता महाराजांच्या पादुका बसने पंढरपूरकडे रवाना होतील. 19 जुलै ते 24 जुलैपर्यंत पादुका पंढरपूरमध्ये राहतील. 24 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत पालखी पुन्हा मुख्य मंदिरात राहील.
हेही वाचा - Pandharpur Wari 2021 : पायी वारी रद्द, वारकरी संप्रदाय खालापूर प्रखंडकडून राज्य सरकारचा निषेध