सोलापूर - पंढरपूर येथील भीमा नदी पात्रातील वाळू चोरून तिच्या केल्या जाणाऱ्या वाहतुकीला लगाम लावत दोन ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली आहे. जवळपास 87 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये नऊ आरोपींवर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मौजे चळेगाव येथील भीमा नदी पात्रातील वाळू चोरून तिची वाहतूक होत असल्याची माहिती विशेष पोलीस पथकाला मिळाली होती. मठवस्ती ते बोहली गाव या मार्गावर पोलिसांनी सापळा लावला होता. या कारवाईमध्ये दोन हायवा टीपर, 3 कार, 8 ब्रास वाळू असा 61 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये पाच आरोपींविरुद्ध पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गणेश दत्तात्रय लोंढे (रा. पंढरपूर), राम जगन्नाथ धोत्रे (रा. गादेगाव, पंढरपूर), गणेश दत्तात्रय कोळेकर (रा. महुद, सांगोला), तात्या शिवाजी बंडगर (रा. महुद, सांगोला), नागनाथ शिवाजी घोडके (रा बोहले पंढरपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत.
दुसऱ्या कारवाईत मठवस्ती ते कासेगाव दरम्यान चार ब्रास वाळू सह एक हायवा टीपर दोन कार असा एकूण 26 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चार आरोपींविरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये आशितोष तानाजी आसबे (रा. सरकोली, पंढरपूर), जीवन दत्तात्रय भोसले (रा. सरकोली, पंढरपूर), आनंद पंडित भोसले (रा. सरकोली, पंढरपूर) अशी अटक केलेल्या आरोपिंची नावे आहेत. ही कारवाई ग्रामीण पोलीस दलातील विशेष पोलीस पथकातील एपीआय प्रकाश भुजबळ, पोलीस शिपाई कल्याणी भोयिटे, मनोज राठोड, शैलेश जाधव आदींनी ही कारवाई केली.