सोलापूर - पंढरपूर जवळच्या गावांमध्ये कोरोनाचे 3 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे गुन्ह्यांचा तपास करुन न्याय मिळवून देणाऱ्या पोलिसांचे कामच बदलले आहे. गुन्हेगारी वाढू नये यासाठी कार्यरत असलेले पोलीस दल आता शहराचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी होम क्वारंटाईन लोकांचा शोध घेण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.
शहरामध्ये नाकाबंदी केली जात आहे. यामध्ये कराड मार्गावरील फुट रस्ता, पुणे-सातारा रस्त्यावरील वाखरी चौक, टेंभूर्णी रस्त्यावर अहिल्यादेवी चौक, कोल्हापूर कडून येणाऱ्या रस्त्यावरील चौथा मैल चौक, गोपाळपूर चौक या पाच ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पंढरपूर शहरात बाहेरगावाहून येणाऱया नागरिकांना बाहेरच अडवण्यात येत आहे. त्या नागरिकांकडे असणाऱ्या परवान्यांची बारकाईने पाहणी करण्यात येते. त्यानंतर त्यांच्या संदर्भातील माहिती उपजिल्हा रुग्णालयाला कळवण्यात येते. या लोकांना रुग्णालयात नेऊन होम क्वारंटाईन करण्यापर्यंत पोलीस पाठपुरावा करत आहेत. बाहेरुन आलेल्या लोकांची यादी नगरपरिषद, उपजिल्हा रुग्णालय व पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध आहे. उपजिल्हा रुग्णालय व नगरपरिषद प्रशासनाकडून रोज होम क्वारंटाईन लोकांच्या आरोग्यबाबतची चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांच्या चार्ली विभागाचे बदलले काम -
पंढरपूर शहरात होणाऱ्या अवैद्य धंद्यांवर नियंत्रण ठेवण्याचे. तसेच शहरात अनपेक्षित उद्भवणाऱ्या प्रसंगाच्या वेळी तत्काळ येऊन परिस्थिती नियंत्रीत आणण्याचे काम चार्लीचे पथकाचे कर्मचारी करतात. गर्दीच्या ठिकाणी पाकिटमार, छेडछाड असे प्रकार रोखण्यासाठी चार्लीची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे त्यांच्या कामाचे स्वरूपच बदलले आहे. आता बाहेरुन आलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्याचे काम ते करत आहेत. रोज होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या घरी दोन वेळा जात आहेत. त्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यापासून रोखण्याचे काम उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चार्लीचे कर्मचारी करत असल्याची माहिती मेजर रणजीत पाटील यांनी दिली.
निर्भया पथक शोधते गर्दीची ठिकाणे -
पंढरपूर शहर व तालुक्यातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थींनींचे छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी निर्भया पथकाची निर्मीती कण्यात आली आहे. यामध्ये पथक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, कॉन्टेबल कुसुम क्षिरसागर, विनोद शिंदे, पोलीस हवालदार अविनाश रोडगे, पोलीस नामदार नितीन चवरे हे काम करतात. त्यांना सहकारी म्हणून समाजसेविका डॉ. संगिता पाटील, चारुशिला कुलकर्णी या देखील काम करतात. सध्या या पथकाचे देखील काम बदलेले असून ते शहरात विनाकारण फिरणाऱया लोकांवर कारवाई करत आहेत. तसेच व्यापा-यांकडून जीवनावश्यक वस्तू नागरीकांना घरपोहच कशा मिळतील, यासाठी प्रयत्न करत आहेत.