पंढरपूर - पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणुकीची मतदान सतरा एप्रिलला होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान करताना मतदारांनी गर्दी करू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून 80 वर्षावरील वृद्ध व दिव्यांग व्यक्तींसाठी तीन दिवस टपाली मतदानाची सोय करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात 80 वर्षांवरील 13600 मतदार आहेत तर दोन्ही तालुक्यांमध्ये 1782 दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांना टपाल मतदानाद्वारे मतदान करता येणार आहे. मात्र, या मतदारांना 17 एप्रिलला मतदान करता येणार नाही.
वृद्ध व दिव्यांग मतदारांना टपाली मतदानासाठी अर्ज करावा लागणार -
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील 80 वर्षाच्या वृद्ध नागरिकांना व दिव्यांग मतदारांना निवडणूक आयोगाकडून टपाली मतदानासाठी घरोघरी जाऊन टपाली मतदानाचा अर्ज वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. या टपाली मतदानाच्या अर्जामध्ये मतदाराचे नाव, मतदान यादी क्रमांक, मतदाराच्या सहीसह मोबाईल नंबर घेण्यात येणार आहे. त्यानंतर तो अर्ज निवडणूक कर्मचाऱ्यांकडून गोळा केला जाणार आहे. हा अर्ज भरल्यानंतर त्या मतदाराला मतदानासाठी मोबाईलवर एसएमएसद्वारे मतदानाची तारीख व वेळ कळवण्यात येणार आहे.
टपाली मतदानासाठी खास अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका -
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीची ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी निवडणूक आयोगाकडून तीन दिवसाच्या टपाली मतदानाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून एक निरीक्षकासह 11 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले. यामध्ये निरीक्षक म्हणून पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची नियुक्ती असणार आहे. संपूर्ण मतदार संघातील टपाली मतदारांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये ऐंशी वर्षावरील 13688 तर दिव्यांग 1782 मतदार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
14 एप्रिलला टपाली मतदान सुरू होण्याची शक्यता -
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत 14 एप्रिल पासून टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया तीन दिवस चालणार आहे. यामध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मतदान करता येणार आहे. मात्र, त्यासाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगकडून अर्ज भरून घेतला जाणार आहे. त्यानंतर एसएमएसद्वारे मतदानाची तारीख व वेळ दिली जाणार आहे. घरी बसून कोणत्याही ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मतदान करता येणार नाही. त्यांना तीन दिवसातील एका दिवशी मतदान केंद्रावर बोलून मतदान करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. या ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना 17 एप्रिलला मतदान करता येणार नाही. मात्र, अद्यापही निवडणूक आयोगाकडून तीन दिवसाच्या तारखा जाहीर न झाल्याची माहिती गजानन गुरव यांनी दिली.
टपाली मतदान प्रक्रियेत राजकीय प्रतिनिधींना संधी मिळणार -
निवडणूक आयोगाकडून टपाली मतदान प्रक्रिया राबवत असताना विविध राजकीय पक्षातील पोलिंग एजंटला मतदान प्रक्रिया सहभागी होता येणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना कोणत्याही प्रकारचा दबाव राजकीय पक्षांचा आणता येणार नाही व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यात मदत होणार आहे. राजकीय पक्षाने नेमून दिलेल्या प्रतिनिधींना सहभागी होता येणार असल्याची माहिती गजानन गुरव यांनी दिली.